spot_img

तीसऱ्या सोमवारी सप्तऋषी पायदळवारीची परंपरा : हजारो शिवभक्त होणार सहभागी… मेहकर तालुक्यातील वडाळी ते विश्वी सप्तऋषींची परिक्रमा .. दर्या खोऱ्यात घुमणार हर हर बोला महादेव

मेहकर ( अनिल मंजुळकर )

आत्मिक शांती व चार धाम परिभ्रमणाचे महत पुण्य प्राप्त करून देणारी सप्तऋषीची पदयात्रा दरवर्षी श्रावण महिन्यातील तिसऱ्या सोमवारी एकाच रात्रीत पूर्ण करण्याची परंपरा असून ,हजारो शिवभक्त सप्तऋषीची पायदळ वारी परीक्रमा पूर्ण करून शिवलिंगाला जलाभिषेक करतात. त्या प्रमाणे हजारो शिवभक्त १८ ऑगस्टच्या मध्यरात्रीपासून अनवाणी पायांनी मेहकर तालुक्यातील श्रीक्षेत्र वडाळी ते विश्वी पायदळ वारी करणार आहेत.

मेहकर तालुक्यातील श्रीक्षेत्र वडाळी येथून प्रातःसमयी ब्रम्ह मुहुर्तावर पवित्र स्नान करून सुर्यवंशाचे गुरु ‘ मुनी वशिष्ठ ‘ ऋषींचे दर्शन घेतल्यानंतर सप्तऋषीच्या वारीला प्रारंभ होणार आहे.
दुसऱ्या क्रमांकाचे श्रीक्षेत्र देळप (उटी ) येथील तपोनिष्ठ आणि मूर्तीमंत त्यागी बगदालभ्य ऋषी, श्रीक्षेत्र गोमेधर येथिल सर्व श्रेष्ठ गौतमेश्वर ऋषी, अतीशय रमणीय असलेले श्रीक्षेत्र वरवंड येथिल वाल्मिकी ऋषी, पुढे श्रीक्षेत्र पाथर्डी येथील ब्रम्हपुत्र पाराशर ऋषी, श्रीक्षेत्र द्रुगबोरीचे त्रिकालज्ञानी दुर्वास ऋषी, आणि शेवटचे श्रीक्षेत्र विश्वी संपूर्ण विश्वातील मित्रांचा उद्धार करणारे विश्वामित्र ऋषी, या सातही ऋषींची वेगवेगळी कहाणी असून त्यांच्या वास्तव्याने हा परीसर आध्यात्मिकदृष्ट्या पावन झाला आहे.


श्रावण महिन्यात महादेवाच्या दर्शनाला महत्व असून, श्रावण महिन्यातील तीसऱ्या सोमवारी सप्तऋषींची वडाळी ते विश्वीपर्यंतची ५० कि.मी. अंतराची परिक्रमा करण्याची परंपरा आहे.


अनवाणी पायाने श्रावणातील सरीत ओल्या अंगाने दर्‍याखोऱ्याच्या घनदाट रस्त्यातून जाणारी पांदण, वाहते नदीचे पाणी, इत्यादी अवघड मार्गाने शिवभक्त ही परिक्रमा पूर्ण करतात. एकाच रात्री सातही ऋषींचे ओल्या कपड्यानिशी दर्शन घेण्याची ही परंपरा शेकडो वर्षापासून चालू आहे. श्रावण महिन्यात सप्तऋषींची केलेली परिक्रमा मानवाला आत्मिक शांती व चारधाम परिभ्रमणाचे महत पुण्य प्राप्त करून देते व इच्छापूर्ती करते , अशी भावीकांची श्रद्धा आहे. १८ ऑगस्टच्या मध्यरात्रीपासून सुरु होणाऱ्या या सप्तर्षींच्या पायदळ वारीत जिल्ह्यांतील हजारो भाविक सहभागी होणार आहेत. शिवभक्तांना सातही ठिकाणी चहा, पाणि व नास्त्याची सोय भावीक गण करतात.

सप्तऋषी परिक्रमा पूर्ण करण्यासाठी पायदळ रस्ता व्हावा.. शिवभक्तांची मागणी

बुलढाणा जिल्ह्यातील मेहकर तालुक्यात श्रीक्षेत्र वडाळी ते विश्वी ही सप्तऋषींची सात पुरातन काळापासूची मंदिरे आहेत. तीर्थक्षेत्र दर्जामधून मंदिरांचा विकास व सप्तऋषीं वारी मार्ग व्हावा म्हणून अनेक वर्षापासून भाविकांची मागणी आहे. गेली अनेक वर्षापासून सत्ता भोगत असलेले खासदार , आमदारांचे मात्र या गोष्टीकडे साफ दुर्लक्ष असल्याचे बोलले जात आहे. सप्तऋषींच्या स्थळांच्या विकासाठी आणि पदयात्रा वारी रस्त्यासाठी पर्यंत होणे गरजेचे आहे.

ताज्या बातम्या

ताज्या बातम्या