मेहकर (अनिल मंजुळकर. रोखठोक न्यूज वृत्त सेवा )
मोठे शहरामध्ये पाठलाग करून चोरट्यांनी रक्कम पळवल्याच्या बातम्या सर्वत्र ऐकायला येतात परंतु चोरटे आता ग्रामीण भागापर्यंत पाठलाग करून रक्कम शकतात यावर कुणाचा विश्वास बसणार नाही परंतु ही घटना घडली आहे देऊळगाव माळी येथे हिवरा आश्रम ता.मेहकर येथील शिक्षक संतोष मदनलाल लद्धड यांनी स्टेट बँकेच्या मेहकर शाखेतून काढलेली नऊ लाखाची रोकड ठेवलेली पिशवी चोरट्यांनी देऊळगाव माळी येथील खालचे बस स्टँड वर गाडीचा काच फोडून पळवली
या घटनेबद्दल सविस्तर वृत्त असे की हिवरा आश्रम येथील रहिवासी असलेले संतोष मदनलाल लद्धड हे सिं.राजा तालुक्यातील हिवरखेड येथील शाळेवर शिक्षक आहे शाळेवर जाताना त्यांनी मेहकर येथील स्टेट बँकेतून स्वतःच्या खात्यातून वैयक्तिक व्यवहारासाठी ११:५२ मिनिटांनी नऊ लाख रूपये कॅश काढली. काढलेली रक्कम पिशवीमध्ये घेऊन त्यांची फोर व्हीलर गाडी क्रमांक (MH28 V 4901) मध्ये ड्रायव्हर साइटच्या बाजूच्या सिट खाली पिशवी ठेवली आणि देऊळगाव माळी मार्गे हिवरखेड येथील शाळेवर जाण्यासाठी निघाले.
ते साडेबारा वाजता देऊळगाव माळी येथे पोहोचले असता त्यांनी त्यांचे मित्र शिक्षक सखाराम बळी व शिक्षक विश्वनाथ मगर यांना फोन करून तुमच्या गावावरून जात आहे असे सांगितले तेव्हा त्यांच्या शिक्षक मित्रांनी आपण चहा घेऊया असे म्हटले तेव्हा संतोष लद्धड यांनी त्यांची गाडी बस स्टैंड वर रोडच्या साईटला लावून तिघेही चहा प्यायला निघून गेले तेवढ्यातच त्यांच्या गाडीचा पाठलाग करणाऱ्या मोटरसायकल वर आलेल्या चोरट्यांनी गाडीचा काच सोडून सीट खाली ठेवलेल्या रकमेची पिशवी घेऊन पोबारा केला.
इकडे हॉटेलमध्ये बसलेल्या शिक्षक संतोष लद्धड व त्यांच्या मित्रांना तात्काळ बाहेर उभे असलेल्या लोकांनी आवाज देऊन तुमच्या गाडीची काच फोडुन त्यातील पिशवी नेली असे लक्षात आणून दिले ताबडतोब सर्वजण गाडी जवळ पळत आले परंतु तो पर्यंत चोरट्यांनी रकमेची पिशवी घेऊन त्या ठिकाणावरुन मोटारसायकल वरून सुसाट वेगाने पळ काढला.
या घटनेची माहिती पोलीस पाटील गजानन चाळगे यांनी मेहकर पोलीस स्टेशनला दिली. माहिती मिळताच उपविभागीय पोलीस अधिकारी प्रदीप पाटील व मेहकर पोलीस स्टेशनचे ठाणेदार राजेश शिंगटे यांनी घटनास्थळी धाव घेऊन परिसरात असलेल्या बँकेच्या बाहेर लावलेल्या कॅमेऱ्याचे सीसीटीव्ही फुटेज चेक करून त्या ठिकाणी मोटरसायकलवर ब्लॅक कपडे घालून आलेले चोरटे गाडीची काच फोडून रक्कम घेऊन सुसाट वेगाने जाताना कॅमेरात कैद झाले आहे.
संबंधित घटने संदर्भात मेहकर स्टेट बँकेच्या परिसरात असलेले कॅमेरे सुद्धा चेक करण्यात आले त्यामध्ये दोन चोरटे त्यांचा पाठलाग करताना कॅमेरात कैद झाले आहे . वृत्त लिहीपर्यंत मेहकर पोलीस स्टेशनला गुन्हा दाखल झालेला नव्हता. पुढील तपास मेहकर पोलीस करत आहे.