spot_img

बावनकुळे यांच्या “ढाबा “विधानाचे बुलढाण्यात पडसाद जिल्ह्यातील पत्रकार संघटना कडून निषेध

 

बुलडाणा : (उद्धव फंगाळ. रोखठोक न्यूज वृत्त सेवा )

अहमदनगर येथील बंदद्वार व पत्रकारांना मज्जाव करण्यात आलेल्या बैठकीत भाजपा प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांनी पत्रकारांबद्दल मुक्ताफळे उधळली. याचे पडसाद बुलढाणा जिल्ह्यात उमटत असून, संग्रामपूर येथे पत्रकारांनी बावनकुळे यांच्या प्रतिकात्मक पुतळ्याचे दहन करीत जळजळीत निषेध नोंदविला तर आज बुधवारी बुलढाणा जिल्ह्यातील विविध पत्रकार संघटनांनी निषेध करून बावनकुळे यांच्यावर कार्यवाही होण्याची मागणी जिल्हाधिकारी यांच्याकडे रेटली आहे.

भारतीय जनता पक्षाच्या ‘महाविजय २०२४ लोकसभा प्रवास’ या ‘घर चलो अभियान’साठी प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे सध्या राज्यभर फिरत आहेत. काल ते नगरला आले होते. यावेळी त्यांनी पदाधिकारी- कार्यकर्त्यांची बैठक घेऊन या अभियानाची कार्यशाळा घेतली. यामध्ये त्यांनी आपल्या विरोधात बातम्या येऊ नयेत, यासाठी काय काळजी घ्यायची, यासंबंधी बोलताना धक्कादायक सल्ला दिला.

‘पत्रकारांना दर महिन्याला चहाला बोलवा, त्यांना ढाब्यावर जेवायला घेऊन जा,’ असा सल्लाच बावनकुळे यांनी कार्यकर्त्यांना दिला. ‘पत्रकारांना दर महिन्याला चहा प्यायला बोलवायचे म्हणजे समजलेच असेल तुम्हाला,’ असे सांगायलाही बावनकुळे विसरले नाहीत. बावनकुळे यांचे हे वक्तव्य निषेधार्य आहे.

 

कोणालाही आपण विकत घेऊ शकतो ही मानसिकता म्हणजे सत्तेचा उन्माद आहे. सारेच पत्रकार विकाऊ नाहीत, हे बावनकुळे यांना निवडणुकीत नक्कीच दिसेल. भाजपा आपल्या वाचाळविरांच्या माध्यमातून राज्यातील पत्रकारांची प्रतिमा मलिन करण्याचा प्रयत्न करीत आहे.बावनकुळे यांनी केलेल्या वक्तव्याचा सर्वच पत्रकार निषेध करीत असून त्यांनी तात्काळ माफी मागावी, अन्यथा जिल्ह्यातील पत्रकार आंदोलनाचा पवित्रा घेतील असा इशारा जिल्हाधिकारी यांना दिलेल्या निवेदनातून देण्यात आला आहे.

 

यावेळी जिल्हा पत्रकार संघ, महाराष्ट्र राज्य मराठी पत्रकार संघ, टीव्ही जर्नलिस्ट संघटना, स्मॉल अँड मिडीयम न्यूज पेपर असोसिएशन, पुरोगामी पत्रकार संघ, प्रेस कौन्सिल ऑफ इंडिया, शासनमान्य पत्रकार संरक्षण समिती महाराष्ट्र, रिपब्लिकन न्यूज पेपर्स असोसिएशन या जिल्ह्यातील पत्रकार संघटनांचे पदाधिकारी उपस्थित होते.

ताज्या बातम्या

ताज्या बातम्या