spot_img

विरोधकांची चौथी विकेट घेऊन संजय रायमुलकर चौकार मारणार – विराट सभेत मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचे प्रतिपादन

मेहकर (अनिल मंजुळकर, हर्षल गायकवाड)
मेहकरला शारंगधर बालाजी आहे त्यामुळे इथे सर्व अलबेलच असते. रायमुलकरांच्या प्रेमापोटी सभेला आणि शहराच्या रस्त्या रस्त्यावर जमलेली प्रेमाच्या माणसांची गर्दी पाहिली. गेली तीस वर्षे इथे आपण शिवसेनेवर भरभरून प्रेम केले. तसेच मोठ्या संख्येने मतदान करा. विरोधकांची चौथी विकेट घेऊन संजय रायमुलकर त्यांचे डिपॉझिट जप्त करत चौकार मारतील याची मला खात्री आहे, असे मेहकर येथील विराट सभेत मुख्यमंत्री एकनाथ शिंदे म्हणाले.

जमलेली प्रचंड गर्दी पाहून मुख्यमंत्री शिंदे हर्षउल्हसित झाल्याचे दिसले. प्रचंड जोशात त्यांनी भाषण केले. महायुतीचे उमेदवार आमदार संजय रायमुलकर व त्यांच्या धर्मपत्नी रंजनाताई रायमुलकर यांनी प्रचंड जनसमुदायासमोर लोटांगण घालत त्यांना वंदन केले. हे पाहून मुख्यमंत्री एकनाथ शिंदे म्हणाले की ,तुम्ही जनतेला दंडवत घातलात, आता त्यांना तुम्हाला आशीर्वाद देणे भाग आहे. रायमुलकर हे धडपडणारे कट्टर शिवसैनिक आहेत व त्यांच्या मागे प्रतापराव जाधव यांची ताकद उभी आहे ,आणि जनतेचे प्रचंड प्रेम सोबत आहे. त्यामुळे जो काम करेगा वो आगे बढेगा असेच घडणार आहे. ही प्रचंड गर्दी बघता इथे विरोधकांचे डिपॉझिट जप्त झाल्याशिवाय राहणार नाही याची मला खात्री आहे.

प्रारंभी छत्रपती शिवाजी महाराज शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे, आनंद दिघे यांच्या प्रतिमांना पुष्पहार अर्पण करून मुख्यमंत्री एकनाथ शिंदे व प्रमुख नेत्यांनी अभिवादन केले. जो काम करेगा वो आगे बढेगा, राजा का बेटा राजा नही बनेगा, असे सांगून शिंदे पुढे म्हणाले की, सर्व खासदार डॉ. श्रीकांत शिंदे यांना मंत्री बनवा ,असे म्हणत होते. परंतु मी प्रतापराव जाधव यांना केंद्रात मंत्रिपद दिले. आम्ही जनतेचे अपार प्रेम मिळवले .हीच आमची खरी दौलत आहे. महाविकास आघाडीच्या काळात मेहकर मतदार संघाला ३५कोटी मिळाले ,परंतु आमच्या काळात आम्ही साडेचार हजार कोटींची विकास कामे येथे केली. उद्धव ठाकरे यांनी बाळासाहेबांचे विचार आणि धनुष्यबाण काँग्रेसच्या दावणीला बांधला.
राज्यातील साडेबारा कोटी जनतेशी त्यांनी बेइमानी केली, असा आरोप शिंदे यांनी केला. मूळ शिवसेनेचा सर्व मतदार आमच्या सोबत आहे. बाळासाहेबांचे विचार आणि धनुष्यबाणही आमच्या सोबत आहे. आम्हीच खरी शिवसेना आहोत, असे प्रतिपादन करून एकनाथ शिंदे म्हणाले की, त्यांनी सर्व प्रकल्प बंद केले होते. शिवसैनिकांचे खच्चीकरण आम्हाला सहन होत नव्हते. आम्ही निर्णय घेतला आणि सर्व योजना सुरू केल्या. महाराष्ट्र सुजलाम सुफलाम करण्याचा प्रयत्न केला.

आम्ही घेणारे नाही देणारे आहोत, असे सांगून ते म्हणाले की, शेतकऱ्यांना पिक विमा नुकसान भरपाई पंतप्रधान मुख्यमंत्री किसान योजना यातून भरभरून दिले. वीज बिल माफ करून टाकले. कृषी पंपांचे यापुढेही वीज बिल शेतकऱ्यांना भरावे लागणार नाही. लाडक्या बहिणींना पाच महिन्याचे पैसे त्यांच्या बँक खात्यात आम्ही जमा केले. ती रक्कम आता पंधराशे वरून २१०० रुपये प्रति महिना करणार आहोत. शेतकऱ्यांची कर्जमाफी, शेतकरी सन्मान योजनेत वाढ, सर्वांना रोटी कपडा आणि मकान, वृद्धांना २१०० रुपये पेन्शन, २५ लाख रोजगार निर्मिती, दहा लाख युवकांना प्रतिमाह १० हजार रुपये, विक्रमी संख्येने पांदण रस्ते, अंगणवाडी सेविकांना १५ हजार रुपये महिना हे सर्व आम्ही करण्याचे अभिवचन देत आहोत, असे टाळ्यांच्या प्रचंड कडकडाटात त्यांनी जाहीर केले.
घरगुती वीज बिलात ३० टक्के सवलत आम्ही देणार आहोत. शेतमालाला कमी भाव मिळाल्यास २० टक्के पर्यंतचा फरक देणार आहोत. महायुतीचे सरकार जे बोलेल तेच करेल, अशी आमची नीती आहे.
मुस्लिम आणि मागासवर्गीय समाजाची लोकसभा निवडणुकीत विरोधकांनी दिशाभूल करून त्यांना फसवले, असे सांगून शिंदे म्हणाले की, सर्व सर्वधर्मीयांना सामान्य देणारे आमचे सरकार आहे. त्यामुळे आता फसू नका, असे आवाहनही त्यांनी केले.
केंद्रीय मंत्री प्रतापराव जाधव आपल्या भाषणात म्हणाले की, तुमच्या ताकदीच्या भरवशावर हा शिवसेनेचा बालेकिल्ला आहे. तो नेहमी अभेद्य राहणार आहे. महायुती सरकारच्या सर्व धाडसी निर्णयांमुळे सर्व समाज घटकांचे मोठ्या प्रमाणात फायदे झाले आहेत. त्यामुळे संजय रायमुलकर यांना चौथ्यांदा प्रचंड बहुमताने विजयी करा.

लोकवर्गणी करून लोकांनी माझे निवडणूक लढली मला तीन वेळा विजयी केले .बाळासाहेब ठाकरे यांच्या विचारावर आम्ही कमी राजकारण आणि जास्त समाजकारण करतो,असे सांगून संजय रायमुलकर म्हणाले की, धाडसी नेतृत्व असलेले मुख्यमंत्री शिंदे यांच्या पाठीशी आपल्याला भर भक्कम ताकद उभी करायची आहे. धनुष्यबाण निशाणीचे बटन दाबून मला आपले आशीर्वाद द्या, असे आवाहन त्यांनी केले. यावेळी शिवसेना जिल्हाप्रमुख प्रा .बळीराम मापारी, शिवसेनेचे नाशिक जिल्हाप्रमुख भाऊलाल तांबडे, जिल्हा उपप्रमुख राजेंद्र गाडेकर ,युवासेनेचे जिल्हाप्रमुख ऋषिकेश जाधव, महिला आघाडीच्या जिल्हाप्रमुख मायाताई म्हस्के, आशाताई झोरे, एकनाथ खरात यांची यावेळी भाषणे झाली.
व्यासपीठावर राजश्रीताई जाधव, बाजार समिती सभापती माधवराव जाधव, तालुकाप्रमुख सुरेशतात्या वाळूकर, भगवानराव सुलताने ,शहरप्रमुख जयचंद बाठीया,पांडुरंग सरकटे, महिला आघाडीच्या कविताताई दांदडे, वैशाली सावजी, युवा सेनेचे भूषण घोडे, भाजपचे ऍड. शिव ठाकरे ,प्रल्हादअण्णा लष्कर, भगवानराव सानप, ठोकळ महाराज, राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेश सरचिटणीस गिरधर पाटील, गजानन सावंत, विजयराव जाधव, राजेंद्र पळसकर, शिवछत्र मित्र मंडळाचे अध्यक्ष नंदूभाऊ मापारी ,भगवानराव कोकाटे ,अशोक वारे संपतराव देशमुख ,मंगेश तट्टे,नितीन राऊत, भास्कर राऊत, जितुभाऊ सावजी आदी प्रामुख्याने उपस्थित होते. सूत्रसंचालन जयचंद बाठीया यांनी केले. सभेला १५ हजारपेक्षा अधिक महिला पुरुष आणि युवकांची भरगच्च उपस्थिती होती.

ताज्या बातम्या

ताज्या बातम्या