spot_img

बहुमताने महायुती सरकार आल्यास शेतकऱ्यांची सरसगट कर्जमाफी केली जाईल – केंद्रीय मंत्री प्रतापराव जाधव 

मेहकर (अनिल मंजुळकर.रोखठोक न्युज वृत्तसेवा)

शिवसेना, भाजप ,राष्ट्रवादी काँग्रेस महायुतीचे बहुमताचे सरकार आल्यास शेतकऱ्यांना सरसकट कर्जमाफी दिली जाईल. लाडकी बहीण योजनेच्या रकमेत वाढ करण्याबरोबरच युवकांसाठी २५ लाख रोजगार निर्मिती करण्यात येणार असल्याचे आमचे अभिवचन आहे ,असे केंद्रीय आयुष आरोग्य कुटुंब कल्याण राज्यमंत्री प्रतापरावजी जाधव यांनी सांगितले.

विधानसभा निवडणुकीनिमित्त महायुतीच्या वतीने तयार करण्यात आलेले वचननाम्याचे प्रकाशन आज मेहकर येथे नामदार प्रतापरावजी जाधव यांच्या हस्ते करण्यात आले. या निमित्त आयोजित पत्रकार परिषदेत त्यांनी वरील माहिती दिली. पत्रकार परिषदेला शिवसेनेचे उपजिल्हाप्रमुख राजेंद्र गाडेकर तालुकाप्रमुख सुरेशतात्या वाळूकर, शहरप्रमुख जयचंद बाठीया , भारतीय जनता पक्षाचे पदाधिकारी ऍड. शिव ठाकरे ,प्रल्हाद अण्णा लष्कर, ठोकळ महाराज, राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेश सरचिटणीस गिरधर पाटील व अन्य प्रमुख पदाधिकारी यावेळी प्रामुख्याने उपस्थित होते.

महायुतीच्या वचननाम्याबाबत माहिती देताना ना. प्रतापरावजी जाधव पुढे म्हणाले की, सर्व घटकांसाठी उपयोगी ठरणारे निर्णय मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वात महायुती सरकारने घेतले आहेत .विरोधी पक्षांनी पूर्वी चुकीचा अपप्रचार केला होता. संविधान बदलले जाईल इत्यादी नकारात्मक गोष्टी मांडल्या होत्या. परंतु महायुती सरकारने आपल्या कृतीतून त्या सर्व गोष्टी फोल होत्या, हे दाखवून दिले आहे .पिकविमा ,अतिवृष्टीमुळे, गारपिटीमुळे नुकसान भरपाई, पंतप्रधान व मुख्यमंत्री किसान योजना या माध्यमातून शेतकऱ्यांच्या बँक खात्यात मोठ्या रकमा आलेल्या आहेत.

लाडकी बहीण योजनेमुळे ग्रामीण भागातील अर्थव्यवस्थेला चालना मिळालेली आहे. लाडक्या बहिणींना महायुती सरकार बहुमताने विजय करून दिल्यास प्रतिमाह २१०० रुपये देण्यात येणार आहेत ,तर शेतकऱ्यांची सरसकट कर्जमाफी करण्यात येऊन शेतकरी सन्मान योजनेतून वर्षाला १५ हजार रुपये देण्यात येणार आहेत. प्रत्येकास अन्न आणि निवारा निर्माण केला जाईल. वृद्ध पेन्शन धारकांना २१०० रुपये दर महिन्याला देण्याचे आमचे वचन आहे. जीवनावश्यक वस्तूंच्या किमती स्थिर ठेवल्या जातील.

२५ लाख युवकांना दरमहा दहा हजार रुपये विद्या वेतन देण्याचे अभिवचन महायुती देत आहे. ४५ हजार गावांमध्ये शेत रस्ते व पांदण रस्त्याची निर्मिती करण्यात येणार आहे .अंगणवाडी आणि आशा सेविकांना पंधरा हजार रुपये आणि विम्याचे संरक्षण देण्याचा निर्णय आम्ही घेतलेला आहे. वीज बिलात ३० टक्के कपात करून सौर आणि अक्षय उर्जेवर भर देण्याचे आम्ही जाहीर वचन दिलेले आहे .सरकार स्थापनेनंतर व्हिजन महाराष्ट्र २०२९ हे स्वप्न साकार केले जाणार आहे, असेही प्रतापरावजी जाधव म्हणाले.

मेहकर लोणार तालुक्यातील ६४ हजार शेतकऱ्यांची पिक विम्याची रक्कम सरसकट यापूर्वीच मंजूर करण्यात आलेली आहे. काही शेतकऱ्यांना ते मिळालेली आहे. राहिलेल्या सर्वांना टप्प्याटप्प्याने शेतकऱ्यांना मिळणार आहे, अशी माहिती ही प्रतापराव जाधव यांनी दिली. उद्योग गुजरातला पळवल्याचा आरोप खोटा असून ५२ टक्के विदेशी गुंतवणूक महाराष्ट्र राज्यामध्ये आहे, अशी माहिती देऊन ते म्हणाले की, उद्योग क्षेत्रात राज्याने भरारी घेतलेली आहे. लाडकी बहीण योजनेला विरोध करणाऱ्या काँग्रेसने आता जाहीरनाम्यातच महिलांसाठी योजना देण्याचे आश्वासन दिले आहे हा त्यांचा खोटारडेपणा आहे. धडाकेबाज निर्णय व त्याची त्वरित अंमलबजावणी ही महायुती सरकारची प्रमुख वैशिष्ट्ये असून भविष्यकाळातही यापेक्षाही दमदार कामगिरी करण्यात येईल.

सरकारने सोयाबीन साठी हमीभाव ठरवून दिलेला आहे ,त्याप्रमाणे आता शेतकऱ्यांना प्रतिक्विंटल चार हजार नऊशे रुपये मिळतील ,असेही जाधव म्हणाले. विरोधकांच्या कुठल्याही भुलथापांना बळी न पडता महायुतीच्या उमेदवारांना प्रचंड बहुमताने निवडून द्यावे, असे आवाहनही त्यांनी केले. पत्रकार परिषदेत महायुतीच्या वचननाम्याचे प्रकाशन प्रतापरावजी जाधव व भाजप राष्ट्रवादी काँग्रेसच्या पदाधिकाऱ्यांच्या हस्ते करण्यात आले.

ताज्या बातम्या

ताज्या बातम्या