मेहकर (अनिल मंजुळकर. रोखठोक न्युज वृत्तसेवा )
मेहकर विधानसभा मतदारसंघात माजी सनदी अधिकारी सिद्धार्थ खरात यांना उमेदवारी जाहीर झाल्यानंतर महाविकास आघाडी मधील अन्य पक्ष बेचैन झाले असून या ठिकाणी काँग्रेसची चांगली ताकद असल्याचे वारंवार प्रत्येक निवडणुकीत दिसून आले आहे .त्यामुळे काँग्रेसचे स्थानिक पदाधिकारी कार्यकर्ते संतप्त झाले असून काल येथे पार पडलेल्या बैठकीत काँग्रेसच्या वतीने लक्ष्मणराव घुमरे यांनी आपला उमेदवार अर्ज दाखल करावा ,प्रसंगी अपक्ष उभे राहावे ,अशी कार्यकर्त्यांनी मागणी केली. त्यामुळे घुमरे तारीख २८ ऑक्टोबर रोजी आपला उमेदवारी अर्ज दाखल करणार आहेत.
तीन वेळा मेहकर मतदार संघाचे प्रतिनिधित्व केलेले आमदार संजय रायमुलकर यांनी महायुतीच्या वतीने प्रचंड जल्लोषात आपला उमेदवारी अर्ज दाखल केला आहे. केंद्रीय राज्यमंत्री प्रतापराव जाधव यांच्या होमपीचवर महायुतीचा उमेदवार विजयी करण्यासाठी ते प्राण पणाला लावणार हे निश्चित आहे. ते ज्याप्रमाणे चौथ्यांदा खासदार म्हणून विजयी झाले, त्याप्रमाणे संजय रायमुलकर हे चौथ्यांदा आपले नशीब आजमावत आहेत.२०१९ च्या निवडणुकीत रायमुलकर हे विदर्भातील सर्वाधिक मताधिक्याने विजयी झालेले उमेदवार ठरले होते. तब्बल ६२हजार मतांचे मताधिक्य घेत त्यांनी विजय संपादन केला होता.
उबाठाचे उमेदवार सिद्धार्थ खरात हे स्थानिक रहिवासी नसल्याच्या चर्चेने सध्या जोर धरलेला आहे. पूर्वइतिहास सांगतो की, विधानसभेच्या असो किंवा लोकसभेच्या प्रत्येक निवडणुकीत येथे ज्या ज्या वेळी काँग्रेसचा उमेदवार निवडणूक रिंगणात होता त्यांनी ४० ते ५० हजार मते घेतलेली आहेत. त्यामुळे या वेळच्या विधानसभा निवडणुकीत ही जागा काँग्रेसला सुटावी यासाठी काँग्रेसच्या पदाधिकाऱ्यांनी शर्थीचे प्रयत्न केले. परंतु उबाठाचे उमेदवार जाहीर झाले, त्यात मेहकरचाही उमेदवार खरात यांच्या रूपाने जाहीर झाला.
यामुळे उबाठाची इथे कसलीही ताकद नाही ,असे सांगत काँग्रेसच्या पदाधिकाऱ्यांनी काल ता. २५ रोजी तालुका काँग्रेस कमिटीच्या कार्यालयात बैठक घेतली.
केवळ पैशाच्या जोरावर सिद्धार्थ खरात यांनी ऊबाठाची उमेदवारी मिळवली आहे, असा आरोप या बैठकीत वक्त्यांनी केला.
विशेषतः ग्रामीण भागात काँग्रेसच्या कार्यकर्त्यामध्ये यामुळे नाराजी असून कुठल्याही परिस्थितीत इथे काँग्रेसचाच उमेदवार हवा, असे मत या बैठकीत व्यक्त झाले. बैठकीच्या अध्यक्षस्थानी जिल्हा परिषदेचे माजी सभापती नंदकिशोर बोरे होते.
काँग्रेसचे ज्येष्ठ नेते लक्ष्मणराव घुमरे यांनी एक काँग्रेसचा व एक अपक्ष असे दोन फॉर्म भरावेत, असा कार्यकर्त्यांनी आग्रह केला .तो घुमरे यांनी मान्य केला आहे. बैठकीत घुमरे यांनी खरात यांच्या उमेदवाराला कडाडून विरोध करत कुठल्याही परिस्थितीत काँग्रेसचाच उमेदवार येथे राहील ,उमेदवारी न मिळाल्यास अपक्ष म्हणून उभे राहण्याचा निर्धार त्यांनी व्यक्त केला. ता. २८ रोजी आपण उमेदवार अर्ज दाखल करणार असल्याचे त्यांनी जाहीर केले.उबाठा गटाचे जिल्हा संघटक डॉ. गोपाल बछिरे हे सुध्दा अर्ज दाखल करणार आहेत.
निवडणुकीत काँग्रेस कडून किंवा अपक्ष म्हणून लक्ष्मणराव घुमरे यांच्या रूपाने काँग्रेसचा उमेदवार उभा राहिला तर ही बाब उबाठाचे सिद्धार्थ खरात यांना अडचणीची ठरणार आहे.