मेहकर (अनिल मंजुळकर. रोखठोक न्युज वृत्तसेवा)
आमदार संजय रायमुलकर यांच्या सततच्या पाठपुराव्यामुळे शासनाच्या नगर विकास विभागाने लोणार शहराच्या विविध भागातील चार कोटी रुपयांची विविध विकास कामे तारीख २५ सप्टेंबर रोजी मंजूर केली आहेत.
केंद्रीय आयुष, आरोग्य ,कुटुंब कल्याण राज्यमंत्री प्रतापराव जाधव (स्वतंत्र प्रभार) यांच्या मार्गदर्शनाखाली आमदार रायमुलकर यांच्या प्रयत्नातून लोणार शहरातील विविध चार कोटींची विकास कामे मंजूर झाली आहेत.
नगरविकास विभागाच्या वतीने ता. २५ सप्टेंबर रोजी उपसचिव श्रीकांत आडंगे यांच्या स्वाक्षरीने प्रसिद्ध झालेल्या परिपत्रकान्वये सदर मंजुरी प्रदान करण्यात आली आहे. गवळीपुरा भागातील नगर परिषदेच्या खुल्या जागेवर मुस्लिम समाजासाठी शादी खाना बांधकाम ५० लाख रुपये, नगरपालिकेच्या विविध शाळांचे बांधकामासाठी एक कोटी वीस लाख रुपये, त्याचप्रमाणे महावीरनगर मधील मेन रोड ते बचाटे, दहातोंडे यांच्या घरापर्यंत रस्त्याचे बांधकाम व नाली बांधकाम एक कोटी १५ लाख रुपये ,खटकेश्वर नगर मधील विजय सानप यांच्या घरापासून लोणी रस्त्यापर्यंत रस्त्याचे व नालीचे बांधकाम ३० लाख रुपये, लिंबी बारव ते निकस सर यांचे घर रस्ता व नाली बांधकाम ५० लाख रुपये , राहुल मापारी यांच्या घरासमोरील रस्त्याचे व नालीचे बांधकाम ३५ लाख रुपये. विकास कामांच्या मंजुरीबद्दल आमदार संजय रामुलकर यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे ,उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, अजितदादा पवार यांचे आभार मानले आहेत.
नगर विकास विभागाकडून वरीलप्रमाणे लोणार शहरासाठी चार कोटी रुपयांची विकास कामे मंजूर करण्यात आल्याची माहिती आमदार रायमुलकर यांचे स्वीय सहाय्यक रुपेश गणात्रा यांनी दिली आहे.