लोणार (अनिल मंजुळकर. रोखठोक न्युज वृत्तसेवा)
शेतकऱ्यांना एक रुपयात पीकविमा,कृषिपंपाची वीजबिल माफी, कृषि खात्याच्या विविध योजना, महिलांसाठी लाडकी बहीण योजना, बचतगटांसाठी अर्थसहाय्य, युवकांसाठी योजना, ग्राम व शहर विकासासाठी कोट्यावधी रुपयांच्या विक्रमी योजना देणारे एकनाथ शिंदे हे राज्याच्या इतिहासातील एकमेव धाडसी मुख्यमंत्री आहेत, असे विचार आमदार संजय रायमूलकर यांनी व्यक्त केले.
मेहकर लोणार तालुक्यातील निवृत पोलीस पाटलांचा निरोप समारंभ आणि शिंदे सरकारने पोलीस पाटील यांच्या मानधनात केलेल्या भरीव वाढीबद्दल आमदार रायमूलकर यांचा सत्कार सुलतानपूर येथील वेदांत आश्रम येथे आज आयोजित करण्यात आला होता.त्यावेळी संजय रायमूलकर यांनी आपल्या भाषणात वरील विचार व्यक्त केले.माजी सभापती डॉ. हेमराज लाहोटी, शिवसेनेचे जिल्हाप्रमुख प्रा.बळीराम मापारी, कैलास पारीख, वामनराव झोरे,सरपंच संघटना अध्यक्ष अरुण दळवी, मनोज भानापुरे, भारत शिंदे, रामेश्वर भिसे, नायब तहसीलदार राठोड, ठाणेदार लोणार श्री मेहेत्रे प्रमुख अतिथी म्हणून उपस्थित होते.
पाहुण्यांचे स्वागत मधुकर पाटील, पंजाबराव धांडे, राजीव भानापुरे, अनिल बोबडे, अशोक धान्डे, राजु मुळे यांनी केले.यावेळी निवृत 22 पोलीस पाटलांचा सत्कार आमदार रायमूलकर यांच्या हस्ते करण्यात आला.संघटनेतर्फे रायमूलकर यांचा सत्कार करून शासनाप्रती कृतज्ञता व्यक्त करण्यात आली.
आपल्या भाषणात संजय रायमूलकर पुढे म्हणाले की, मुख्यमंत्री शिंदे यांनी गेल्या अडीच वर्षात गतिमान व धडसी निर्णय घेऊन जनतेचे हित साधले.सर्व घटकांसाठी मोठे निर्णय घेतले.गेली अनेक वर्षे पोलीस पाटलांच्या मानधनात वाढ करण्याचा प्रश्न मुख्यमंत्र्यांनी सोडवून साडेसहा हजार वरून ते 13 हजार 500 केले.
मेहकर मतदारसंघात 3 हजार 700 कोटींपेक्षा अधिक रकमेची विकासकामे झाली.मतदारसंघ एक कुटुंब आहे, असे सांगून रायमूलकर म्हणाले की, केंद्रीय मंत्री प्रतापराव जाधव यांच्या मार्गदर्शनाखाली 15 वर्षे लोकांची सेवा करता आली, हे माझे भाग्य आहे. तंटामुक्ती समिती आणि पोलीस पाटील, सरपंच यांच्या माध्यमातून आणि प्रशासनाच्या समन्वयातून गावातील वाद गावातच मिटविण्याचा प्रयत्न व्हावा, अशी अपेक्षा त्यांनी व्यक्त केली.जिल्ह्यात 1240 पैकी सातशेपेक्षा पोलीस पाटलांच्या जागा रिक्त आहेत. मेहकर तालुक्यात 31 जागा रिक्त आहेत,असेही रायमूलकर म्हणाले. यावेळी डॉ. हेमराज लाहोटी, गजानन खोकले, भारत शिंदे, पारीख, प्रा. बळीभाऊ मापारी यांची भाषणे झाली.कार्यक्रमाचे सूत्रसंचालन शरद धोटे यांनी केले.