मेहकर -( रोखठोक न्यूज वृत्त सेवा)
तालुक्यातील सोनाटी येथे शेताच्या धुऱ्या च्या वादातून दोघा बापलेकाचा दुर्दैवी अंत झाला होता. या प्रकरणी मेहकर जिल्हा व सत्र न्यायालयाचे न्यायधीश एस एम चंदगडे यांनी आज दोघा जणांना जन्मठेपेची शिक्षा सुनावली आहे.
फिर्यादी जयश्री अशोक सोनटक्के राहणार सोनाटी यांनी मेहकर पोलिसात तक्रार दाखल केली होती की, तारीख ११ एप्रिल २०१९ रोजी सोनाटी येथील शेतात त्यांचे सासरे दिगंबर सोनटक्के आणि पती अशोक सोनटक्के हे ट्रॅक्टरने नांगरटी करत होते. दुपारी चार ते साडेचार च्या दरम्यान बबन वैजिनाथ सोनटक्के, प्रकाश वैजिनाथ सोनटक्के, नंदाबाई बबन, चंद्रकला प्रकाश सोनटक्के, संदिप प्रकाश सोनटक्के यांनी कुऱ्हाड आणि लाठीने माझे सासरे व पतीस मारहाण केली.
दिगंबर सोनटक्के व अशोक सोनटक्के यांना जखमी अवस्थेत मेहकर येथे रुग्णालयात भरती केले असता डॉक्टरांनी त्यांना मृत घोषित केले. या प्रकरणी उपविभागीय पोलीस अधिकारी रामेश्वर व्यंजने यांनी तपास करून न्यायालयात दोषारोपपत्र दाखल केले. सरकारी वकील ऍड जे एम बोदडे यांनी अकरा साक्षीदार तपासले.
जयश्री सोनटक्के या प्रत्यक्षदर्शी साक्षीदार होत्या. साक्षीपुरावे आणि ऍड बोदडे यांचा युक्तिवाद लक्षात घेता न्यायधीश एस एम चंदगडे यांनी आरोपी बबन वैजिनाथ सोनटक्के आणि प्रकाश वैजिनाथ सोनटक्के यांना जन्मठेपेची शिक्षा व प्रत्येकी दहा हजार रुपये दंड ठोठावला. नंदाबाई सोनटक्के, चंद्रकला सोनटक्के, संदिप सोनटक्के यांची निर्दोष मुक्तता केलीआहे. कोर्ट पैरवी पोलीस कर्मचारी पुरुषोत्तम गारोळे यांनी केली.