मेहकर -(नागेश कांगणे. रोखठोक न्यूज वृत्त सेवा)
अवकाळी पावसामुळे तूर ,कपाशी आणि रब्बीच्या हरबरा पिकाचे मोठे नुकसान झालेले असून अधिकाऱ्यांना वेळेत सर्वेक्षण करण्याचे शासनाने आदेश द्यावेत आणि भरपाई रक्कम शेतकऱ्यांना लवकर मिळेल या दृष्टीने त्वरित निर्णय घ्यावा ,अशी मागणी आमदार संजय रायमूलकर यांनी विधानसभेत केली .
जे अधिकारी, कर्मचारी अवकाळीच्या नुकसानीचे सर्वेक्षण वेळेत करणार नाहीत त्यांचेवर कारवाईचे आदेशही शासनाने द्यावेत ,अशी मागणीही त्यांनी केली.नियम १०१ अन्वये अल्पकालीन चर्चेत आ रायमूलकर यांनी शेतकरीहिताचे अनेक प्रश्न उपस्थित करून त्यावर उपाययोजना करण्याची प्रभावी मागणी आपल्या भाषणातून केली .
अजूनही बऱ्याच शेतकऱ्यांची कर्जमाफी झालेली नसून तांत्रिक अडचणी काढून त्यांना लाभ देणे टाळले जात आहे ,असे सांगून रायमूलकर पुढे म्हणाले की , त्या शेतकऱ्यांना रक्कम त्वरित द्यावी.डव्हळे नामक अवैध सावकाराने शेतकऱ्यांचा शेतमाल घेतला पण ११ कोटी रुपये त्यांना दिले नाहीत .त्याच्यावर कडक कार्यवाही करून शेतकऱ्यांना रक्कम मिळण्याची व्यवस्था शासनाने करावी ,अशी मागणीही आ रायमूलकर यांनी केली .
मेहकर,लोणार ,सिंदखेडराजा तालुक्यात सर्वाधिक नेटशेड असून अवकाळी पावसाने त्यांचे मोठे नुकसान झालेले आहे त्या शेतकऱ्यांना नुकसानभरपाई द्यावी , अशी मागणीही त्यांनी शासनाकडे केली .पी एम किसान व सी एम किसान योजनेचा लाभ नेटमध्ये अडचणी आल्यामुळे काही शेतकऱ्यांना मिळालेला नाही .
याबाबत आणि पीकविमा ऑनलाइन करण्याबाबत मोठया अडचणी शेतकऱ्यांना आल्या त्या सर्वांना मॅन्युअली अर्ज कृषी आणि महसूल विभागाकडे करण्याची परवानगी शासनाने द्यावी ,अशी मागणीही आ रायमूलकर यांनी केली .
अकोला,बुलढाणा, वाशीम,अमरावती, यवतमाळ जिल्हे अवर्षणप्रवण असून वैनगंगा, नळगंगा नदीजोड प्रकल्पात या जिल्ह्यांचा समावेश करण्याची मागणीही त्यांनी केली .
आदर्श गाव योजनेत निवड झालेल्या गावांच्या निधीत हेक्टरी दहा हजाराची वाढ करावी , जलसंधारण ची कामे करतांना सप्तसूत्री चा अवलंब करावा , रब्बी हंगामात फळ बागांसाठी पिकविम्याची योजना राबवावी , केळी चा त्यात समावेश करावा , कृषी महाविद्यालयांच्या जागेवर शासनाकडून डॉ पंजाबराव देशमुख आंतरराष्ट्रीय कन्व्हेन्शन सेंटर उभारणी करावी आदी मागण्याही संजय रायमूलकर यांनी आपल्या प्रभावी निवेदनातून केल्या . याबाबत शासनाने त्वरित निर्णय घेण्याची त्यांनी विधानसभा अध्यक्ष्यांकडे केली .