मेहकर: ( हर्षल गायकवाड. रोखठोक न्युज वृत्तसेवा)
जानेफळ मार्गावरील पीर पहाडी दर्गा येथील २५ लाख रुपये खर्चाच्या विकास कामाचे भूमिपूजन माजी आमदार संजय रायमुलकर यांच्या हस्ते करण्यात आले. हाजी साहेब पठाण कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी होते.
पीर पहाडी दर्गा येथे भाविकांच्या मागणीनुसार २५ लाख रुपयांचे काम माजी आमदार संजय रायमुलकर यांनी मंजूर करून देऊन निधी उपलब्ध करून दिलेला होता.काल ता.१७ रोजी सदर विकास कामाचे भूमिपूजन करण्यात आले. यावेळी झालेल्या कार्यक्रमात बोलतांना हाजी साहेब पठाण म्हणाले की ,मतदार संघातील मुस्लिम बांधवांच्या सोयीसाठी संजय रायमुलकर यांनी मोठ्या प्रमाणात निधी दिलेला आहे.
त्यातून शादीखाने, कबरस्तान संरक्षण भिंती, रस्ते आदी कामे करण्यात आली. ते जरी निवडणुकीत थोड्या मतांनी पराभूत झाले असले तरी आमच्या मनात नेहमीसाठी तेच आमदार आहेत. माजी नगरसेवक तौफिक कुरेशी म्हणाले की, शहर आणि ग्रामीण भागात संजय रामुलकर यांनी मोठ्या प्रमाणावर विकास कामे मंजूर करून आणली आहेत, त्याचे श्रेय त्यांचेच आहे अशा कामांमध्ये इतरांनी ढवळाढवळ करू नये. त्यांनी नवीन कामे आणावीत आणि विकास करावा.
यावेळी मार्गदर्शन करताना संजय रायमुलकर म्हणाले की, केंद्रीय मंत्री प्रतापराव जाधव यांच्या मार्गदर्शनाखाली मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या माध्यमातून चार हजार कोटी पेक्षा जास्त विकास कामे मेहकर लोणार तालुक्यात मंजूर करून आणली आहेत. आचारसंहिता लागल्याने बऱ्याच कामांना आरंभ करता आला नाही. आता त्या कामांचे भूमिपूजन आणि लोकार्पण आम्ही करणार आहोत.
सध्या राज्यात महायुतीचेच कार्यक्षम सरकार असल्याने यापुढेही मेहकर लोणार तालुक्यात मोठ्या प्रमाणावर मी विकास कामे आणणार आहे. आम्ही मंजूर करून आणलेल्या विकास कामांचे श्रेय इतरांनी घेऊ नये. त्यांनी नवीन कामे मंजूर करून आणावीत. यावेळी शिवसेनेचे शहर प्रमुख जयचंद बाठीया व इतरांची भाषणे झाली.
याप्रसंगी रविराज रहाटे, रामेश्वर भिसे, समाधान सास्ते, हर्षल गायकवाड, समीरखान ,सलीम कुरेशी, खालील कुरेशी, अमीरभाई, फिरोज अत्तार, शेख सलमान, अलीमखान, हुसेन कुरेशी, वसीमशेख ,कलीम शेख, जाकीर कुरेशी, रईस कुरेशी ,चांद कुरेशी, राजेकअली यांच्यासह अनेक मान्यवर उपस्थित होते.