मेहकर: (हर्षल गायकवाड. रोखठोक न्युज वृत्तसेवा)
आपण संघर्षातून पुढे आलो आहोत. वैयक्तिक भांडणे, हेवेदावे बाजूला सारून आपल्या नव्या जुन्या सहकाऱ्यांना पुन्हा जोडा. प्रत्येक गाव आणि शहरात गोळाबेरीज सुरू करा. आगामी जिल्हा परिषद, पंचायत समिती, नगरपालिका या सर्व निवडणुका एक हाती जिंकण्याचा निर्धार करा असे आवाहन केंद्रीय आयुष, आरोग्य, कुटुंब कल्याण राज्यमंत्री प्रतापराव जाधव यांनी शिवसेना, महायुतीच्या वतीने आयोजित कृतज्ञता मेळव्यात केले.
विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर शिवसेना महायुतीच्या वतीने आज मेहकर येथील वेदिका लॉन सभागृहात कृतज्ञता मेळाव्याचे आयोजन करण्यात आले होते. ६ हजार पेक्षा जास्त पदाधिकारी कार्यकर्ते यांच्या प्रचंड उपस्थितीने सभागृह फुलून गेले होते. माजी जि. प. सभापती राजेंद्र पळसकर यांनी प्रास्ताविक भाषणातून निवडणूक निकालाच्या विश्लेषण केले. आपल्या भाषणात माजी आमदार संजय रायमुलकर म्हणाले की, निवडणुकीत हारजीत असतेच. निवडणूक निकालाच्या दिवशी आपल्या कार्यकर्त्यांवर विरोधकांकडून दगडफेक झाली.
पहिली ठिणगी त्यांनी टाकली आहे आणि दोष आपल्याला देण्याचा प्रयत्न होतो आहे. महायुती सरकार आणि मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या माध्यमातून भरीव विकास कामे मतदार संघात आणली आहेत. ती पूर्ण करण्याची जबाबदारीही आमची आहे .मेहकर बसस्थानक आणि पेनटाकळी प्रकल्पाच्या कालव्याचे काम याबाबत उद्धव ठाकरे यांनी कवडीचेही सहकार्य केलेले नाही. आणि आता त्यांचे आमदार आयत्या पिठावर रेघोट्या ओढण्याचा प्रयत्न करत आहेत. हे सहन केले जाणार नाही. अंगावर आले तर शिंगावर घेतल्याशिवाय राहणार नाही.
केंद्रात आणि राज्यात आमची सत्ता आहे आणि केंद्रीय मंत्री प्रतापराव जाधव तुमचा बाप येथे आहे ,हे लक्षात ठेवा, असा इशाराही संजय रायमुलकर यांनी आपल्या भाषणातून दिला. वेडे वाकडे वागलात तर प्रसंगी कायदा ही हातात घेऊ, असेही ते म्हणाले. आगामी सर्व निवडणुका जिंकण्याच्या दृष्टीने गावागावातल्या कार्यकर्त्यांनी एकजुटीने कामाला लागावे, असे आवाहनही त्यांनी केले.
मंत्री प्रतापराव जाधव आपल्या भाषणात पुढे म्हणाले की, कुणाला दोष देण्यापेक्षा प्रत्येकाने स्वतः आत्मपरीक्षण करावे. आपण कुठे कमी पडलो हे पाहणे गरजेचे आहे. विरोधकांनी अपप्रचार केला, लोकांनी दोष लक्षात ठेवले, पण विकास कामे लक्षात घेतली नाही. आपण झालेल्या चुका दुरुस्त करू या. तुमच्यातला कार्यकर्ता व स्वाभिमान ,जिद्द, चिकाटी कायम ठेवा. कार्यकर्ताच नाक, कान,डोळा असतो. त्यामुळे कार्यकर्त्यांनी निर्भीडपणाने नेत्याला सर्व गोष्टी सांगितल्या पाहिजे असेही ते म्हणाले.
आपला पक्ष कट्टर हिंदुत्ववादी आहे यावरही आपण लक्ष दिले पाहिजे. सरसंघचालक मोहन भागवत यांनी लोकसंख्या संतुलनासाठी हिंदूंनी तीन अपत्यांना जन्म द्यावा, असे आवाहन केले ते महत्त्वाचे आहे. काही जात समूहाची लोकसंख्या वाढत आहे हे आपल्यासाठी गंभीर आहे. आम्ही सर्व हिंदू म्हणून सर्व जातीपाती एकत्र येणे आवश्यक आहे.
अन्यथा भविष्यकाळ कठीण असेल, असे सांगून प्रतापराव जाधव पुढे म्हणाले की, लाडकी बहीण योजना, इतर योजना व हिंदुत्ववादी विचारांमुळे राज्यात महायुतीचे आमदार मोठ्या संख्येने निवडून आले. आपल्या येथे हे मुद्दे आपण प्रभावीपणे समोर आणू शकलो नाही. क्षुल्लक कारणांनी नाराजी,हेवेदावे महाग पडले. चुकीच्या लोकांना जास्तीचा मोठेपणा देणे व जवळच्या लोकांचा सन्मान न राखणे असेही काही कारणे आहेत. भावना गवळी, कृपाल तुमाने, हेमंत पाटील यांचा योग्य तो सन्मान राखून त्यांना नव्याने पदे देण्याचे काम पक्षाचे मुख्य नेते एकनाथ शिंदे यांनी केले आहे. त्यामुळे काळजीचे कारण नाही, संजय रायमुलकर यांच्या बाबतीत असेच निश्चित चांगले घडेल, असेही ते म्हणाले.
कृतज्ञता मेळाव्यात शिवसेना जिल्हाप्रमुख प्रा. बळीराम मापारी , उपजिल्हाप्रमुख राजेंद्र गाडेकर , राष्ट्रवादीचे प्रदेश सरचिटणीस गिरधर पाटील ,विलासराव मुळे, नंदकिशोर इंगळे, सिताराम ठोकळ महाराज, प्रकाशराव पोफळे, किशोर रहाटे, पिंटूभाऊ आघाव, शंकरराव गायकवाड, अर्जुनराव वानखेडे आदींनी विधानसभा निवडणुकीतील पराभवाबाबत आपले विश्लेषण त्यांच्या भाषणातून मांडले.
यावेळी बाजार समिती अध्यक्ष माधवराव जाधव, शिवसेनेचे तालुकाप्रमुख सुरेशतात्या वाळूकर, भगवानराव सुलताने ,युवासेनेचे जिल्हाप्रमुख ऋषिकेश जाधव ,नीरज रायमुलकर, विलास मोहऋत,नितीन राऊत,बबनराव भोसले,बबनराव तुपे, राष्ट्रवादीचे समीर खान ,गजानन सावंत , भाजपचे सारंग माळेकर, ऍड .शिव पाटील ठाकरे ,प्रल्हादअण्णा लष्कर , ऍड. शिवाजी सानप,माजी नगराध्यक्ष रामराव म्हस्के,डॉ.विजयराव देशमुख, डॉ.केशवराव अवचार, नंदकिशोर निकस, माधवराव आरसोडे ,विजय सानप ,डॉ. काशिनाथ घुगे , कैलास जायभाये,दीपक आखाडे, कारभारी सानप, रामराव नागरे, विश्वंभर दराडे, अशोक वारे, पांडुरंग सरकटे, शिवसेना महिला आघाडीच्या मायाताई म्हस्के, वैशालीताई सावजी, कविताताई दांदडे ,आशाताई झोरे, युवा सेनेचे तालुकाप्रमुख भुषण घोडे , युवा नेते रविराज रहाटे, हर्षल अण्णा गायकवाड,भुषण गारोळे , घनश्याम गायकवाड यांच्यासह अनेक नेते प्रामुख्याने उपस्थित होते. मेळाव्याचे सूत्रसंचालन समाधान साबळे यांनी केले तर आभार भगवानराव सुलताने यांनी मानले.