मेहकर: (समाधान पदमने. रोखठोक न्युज वृत्तसेवा)
शेतकरी चळवळीत रविकांत तुपकर यांच्या खांद्याला-खांदा लावून लढणारे सहकारी डॉ.ज्ञानेश्वर टाले यांना बुलढाणा व वाशिम जिल्ह्यातून दोन वर्षासाठी तडीपार करण्याची नोटीस देण्यात आली आहे. डॉ.ज्ञानेश्वर टाले गेल्या अनेक शेतकऱ्यांच्या प्रश्नावर लढा देत आहेत. त्यांच्या लढ्यामुळे आजवर अनेक शेतकरी, सर्वसामान्य नागरिकांना न्याय मिळाला आहे. त्यामुळे डॉ. टाले यांच्यावर होवू घातलेल्या कारवाई मुळे नागरिकांमधून संतप्त प्रतिक्रिया उमटत आहेत.
एकीकडे चोर, दरोडेखोर खुले आम फिरत असतांना शेतकऱ्यांसाठी लढाणाऱ्याला मात्र तडीपारीची नोटीस, अशा प्रतिक्रिया नागरिकांमधून उमटत आहे.
शेतकरी नेते रविकांत तुपकरांनीही फक्त राजकीय बदला घेण्यासाठीच डॉ.टाले यांना नोटीस दिल्याची प्रतिक्रिया दिली आहे. डॉ. ज्ञानेश्वर टाले हे मेहकर तालुक्यातील माझे अत्यंत जवळचे सहकारी आहेत.
शेतकऱ्यांच्या चळवळीत ते अनेक वर्षांपासून माझ्यासोबत ताकदीने काम करतात. माझ्या लोकसभा निवडणुकीच्या वेळी त्यांनी मेहकर विधानसभा मतदारसंघात अतिशय ताकदीने माझ्या प्रचाराची व नियोजनाची धुरा सांभाळली होती. विद्यमान खासदारांच्या तोडीस तोड मते मला मेहकर विधानसभेत पडली, हे त्यांच्या व सहकाऱ्यांच्या परिश्रमांचे फलित आहे. डॉ. टाले यांच्यावर चोरी, दरोड्यासारखे गुन्हे दाखल नसून केवळ चळवळीच्या पार्श्वभूमीवरील गुन्हे दाखल आहेत. अनेक वेळा खोटे गुन्हे सत्ताधाऱ्यांनी दाखल केले आहेत.
त्यात अतिरेक बघा ऑक्टोबर महिन्यातील नोटीस त्यांना पोलिसांनी काल दिली आहे, जेणेकरून त्यांना बाजू मांडण्यास वेळ मिळायला नको. पण माझ्या सहकाऱ्यांना अशा कितीही नोटीसा दिल्या तरी आम्ही त्याला घाबरत नाही. तुम्ही आम्हाला तडीपार करा नाहीतर फासावर लटकवा,आमची सत्याची लढाई थांबणार नाही. महाराष्ट्राची पूर्ण संघटना व आम्ही डॉ. ज्ञानेश्वर टाले यांच्यासोबत खंबीरपणे उभे आहोत, अशी प्रतिक्रिया रविकांत तुपकरांनी दिली आहे.
तडीपार करा नाहीतर फासावर चढवा शेतकऱ्यांसाठी लढतच राहणार – डॉ.ज्ञानेश्वर टाले
चळवळीत शेतकऱ्यांचे प्रश्न घेऊन रविकांत तुपकर यांच्या मार्गदर्शनाखाली मी व माझे सहकारी १२ वर्षांपासून मेहकर परिसरात काम करीत आहे. शेतकऱ्यांसाठी विविध प्रश्नावर आम्ही अनेक वेळा आंदोलने केली,लाठ्या-काठ्या खाल्या, माझ्यावर जे गुन्हे आहेत ते आंदोलनातील व राजकीय आकासामुळे आहे. काही खोटे गुन्हे सत्ताधाऱ्यांनी दबाव टाकून माझ्यावर दाखल केले आहेत. मी लढणारा माणूस आहे, अशा नोटीसला मी भीत नाही, मला तडीपार करा नाहीतर फासावर चढवा शेतकऱ्यांसाठी मी लढतच राहील, अशी प्रतिक्रिया डॉ. ज्ञानेश्वर टाले यांनी दिली आहे.