मेहकर: (हर्षल गायकवाड. मेहकर रोखठोक न्युज वृत्तसेवा)
माजी आमदार संजय रायमुलकर यांच्या प्रयत्नातून मंजूर झालेल्या चार कोटी रुपये खर्चाच्या मेहकर पोलीस स्टेशनच्या नव्या इमारतीच्या बांधकामास आज सुरुवात झाली असून या कामाची पाहणी संजय रामुलकर यांनी करून बांधकाम दर्जेदार करण्याच्या सूचना कंत्राटदारास दिल्या. संजय रायमुलकर यांच्या प्रयत्नातून जानेफळ व मेहकर येथील पोलीस स्टेशनच्या नव्या इमारतींचे आठ कोटी रुपयांचे बांधकाम मंजूर झाले होते. त्यापैकी जानेफळ पोलीस स्टेशनच्या अध्ययवत इमारतीचे बांधकाम पूर्ण झाले आहे. मेहकर पोलीस स्टेशनची जुनी इमारत इंग्रज कालीन असून ती १९२२ साली टिनपत्रे ,कौलारू अशा पद्धतीने उभारण्यात आली होती. तब्बल १०२ वर्षानंतर आता नवीन सुसज्ज अशा इमारतीचे बांधकाम सुरू झाले आहे.
मेहकर लोणार तालुक्यातील पोलीस स्टेशनच्या इमारतींचे बांधकाम व अधिकारी, कर्मचारी निवासस्थाने बांधकामाच्या मंजुरीसाठी संजय रायमुलकर यांनी शासन दरबारी सातत्याने प्रयत्न करून काही कामे मंजूर करून आणली. मेहकर पोलीस स्टेशनची इमारत बहुमजली असून त्यात पोलीस निरीक्षक कार्यालय व पोलीस निरीक्षक यांची कार्यालये यासह इतर अनेक शाखांसाठी स्वतंत्र कार्यालये ,स्वच्छतागृहे याची व्यवस्था करण्यात येणार आहे.
संजय रायमुलकर यांनी आज सदर कामाची पाहणी करून काम दर्जेदार करण्याबाबत कंत्राटदारास सूचना दिल्या. यावेळी शिवसेनेचे उपतालुकाप्रमुख समाधान साबळे, शहर प्रमुख जयचंद बाठिया, संतोष पवार, दुर्गादास रहाटे, माधव तायडे,मनोज जाधव, विकास जोशी,विनोद भिसे यांच्यासह अनेक मान्यवर उपस्थित होते.