spot_img

आणखीही मोठ्या प्रमाणात विकास कामे मेहकर मतदारसंघात आणणार,वर आमची भक्कम सत्ता आहे – संजय रायमुलकर पत्रकार परिषदेत माहिती

मेहकर: (अनिल मंजुळकर . रोखठोक न्युज वृत्तसेवा)
आम्हाला पराभव मान्य आहे. कार्यकर्त्यांना शांत राहण्याचे आवाहन केले आहे. संघर्षाची सुरुवात विरोधी बाजूने झालेली आहे. आम्ही संयम ठेवून आहोत, पण कोणी विपरीत वागले तर गप्प बसणार नाही , असा स्पष्ट इशारा माजी आमदार संजय रायमुलकर यांनी आज पत्रकार परिषदेत दिला. केंद्र आणि राज्यात आमची भक्कम सत्ता आहे आणखीही मोठ्या प्रमाणात विकास कामे मेहकर मतदार संघात आणणार, असेही ते म्हणाले.
तीन वेळा आमदार म्हणून विजयी झालेले संजय रायमुरकर यावेळी मात्र अल्पमताने पराभूत झाले. महाविकास आघाडीचे सिद्धार्थ खरात विजयी झाले. त्यानंतर शहरात काही अनुचित घटना घडल्या. माळीपेठ मध्ये घडलेल्या जाळपोळ व दगडफेकीनंतर संचारबंदी जारी झाली .नंतर ती उठविण्यात आली. याप्रकरणी २६ जणांवर गुन्हा दाखल झाला. अनेकांना अटक झाली. आमदार सिद्धार्थ खरात यांनी पराभवातून शिवसेनेने मेहकर मध्ये असंतोष निर्माण केला आहे, असे आरोप व्हायरल झालेल्या व्हिडिओ क्लिप मधून केला होता.
या सर्व घटनाक्रमानंतर माजी आमदार संजय रायमुलकर पत्रकार परिषदेत काय खुलासा करणार याची सर्वांना उत्सुकता होती. शिवसेना कार्यालयात पार पडलेल्या पत्रकार परिषदेत रायमुलकर यांनी सांगितले की, मतमोजणीनंतर बाहेर आलेल्या आमच्या काही कार्यकर्त्यांवर दगडफेक झाली. त्यात ते जखमी झाले. यानंतर शिवसैनिकांमध्ये प्रचंड असंतोष निर्माण होऊन ते एकत्र आले. पण मी त्यांची समजूत काढून शांत राहण्याचे आवाहन केले. त्यानंतरही माळीपेठ भागात मरी माता मंदिराजवळ हिरवा गुलाल फेकण्यात आला.
नागरिकांवर दगडफेक आणि जाळपोळ करण्यात आली. हे सर्व अनुचित होते. मेहकर शहरच नव्हे तर मतदार संघात शांतता नांदावी ,इथल्या नागरिकांना कुठलाही त्रास होऊ नये, ही आमची नेहमीसाठी भूमिका राहिलेली आहे आणि त्याप्रमाणे गतकाळात आम्ही वागलो. आम्ही पराभव मान्य केला असून आमचे कार्यकर्ते शांत आहेत. परंतु विजय उमेदवाराच्या बाजूने उन्माद दाखवल्या जात आहे, असा आरोप संजय रायमुलकर यांनी केला. मुंबईत बसून आमदार मी पोलिसांना काही लोकांची यादी देणार आहे असे व्हायरल झालेल्या त्यांच्या
व्हिडिओतून कळले , असे सांगून रायमुलकर म्हणाले की, ज्यांचा घटनेची काही संबंध नाही अशा लोकांना नाहक यात अडकवू नये. पोलिसांनी सर्व बाजूने तपास करावा. विपरीत काही घडले तर आम्ही गप्प बसणार नाही. मी नेहमी मतदार संघ हा एक परिवार समजत आलो आहे .मी कुठलाही जातीभेद कधीही केला नाही .विरोधकांचीही कामे मी केली. मुस्लिम वस्तींमध्ये शादीखाने, मागासवर्गीय वस्तींमध्ये मोठ्या प्रमाणात विकास कामे मी केली. विरोधकांनी निवडणुकीत वैयक्तिक बदनामी केली. चुकीच्या गोष्टी लोकांमध्ये पसरवल्या, असा आरोप रायमुलकर यांनी केला.
पराभवाची कारणे शोधू, आत्मचिंतन करू,असे सांगून ते पुढे म्हणाले की, महाविकास आघाडीला येथे पाच वर्षे मिळाली आहेत ,त्यांनी विकास कामे करावीत. मंजूर असलेली सर्व कामे पूर्ण करून घेण्यात येतील. त्यात कुणी खोडा घालण्याचा प्रयत्न केला तर वर सरकार आमचे आहे, हे त्यांनी लक्षात ठेवावे. आणखी मोठ्या प्रमाणावर विकास कामे मी आणणार आहे. केंद्रीय मंत्री प्रतापराव जाधव यांच्या मार्गदर्शनाखाली मी आतापर्यंत कार्यरत राहिलो.
पुढेही कार्यरत राहणार आहे.मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचे भरपूर प्रेम मिळाले. त्यांच्या माध्यमातून मोठ्या प्रमाणात विकास कामे खेचून आणता आली. एका प्रश्नाला उत्तर देताना संजय रायमुलकर म्हणाले की, मुख्यमंत्री शिंदे यांनी यापूर्वी सांगितले आहे की, माझ्यासोबतच्या आमदारांना मी घरी बसू देणार नाही. त्यांच्या माध्यमातून निश्चितपणे चांगलेच घडेल.ज्या एक लाख लोकांनी मला मतदान केले त्या सर्वांचे आभार मानतो ,असे सांगून रायमुलकर म्हणाले की, निवडणुकीत जय पराजय होतच असतात.
उद्धव ठाकरे मुख्यमंत्री असताना त्यांच्या कुठले सहकार्य मिळाले नाही असे सांगून ते म्हणाले की पेनटाकळी प्रकल्पाच्या ११ किलोमीटर कालव्याचा प्रश्न २० वर्ष प्रलंबित राहिला. त्यासाठी प्रचंड प्रयत्न केले. शेवटी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी एका तासभरात ५८५ कोटी रुपयांची मंजुरी दिली. ते काम सुरू झाले आहे. याचा शेतकऱ्यांना भरपूर फायदा होईल. मतदार संघाचा चेहरा मोहरा बदलण्याचा मी प्रयत्न केला. त्यासाठी चार हजार कोटी रुपयांची विकास कामे आणली. यावेळी कृषी उत्पन्न बाजार समितीचे सभापती माधवराव जाधव, शिवसेनेचे शहर प्रमुख जयचंद बाठिया ,उपतालुकाप्रमुख समाधान साबळे, बबनराव तुपे प्रामुख्याने उपस्थित होते.

ताज्या बातम्या

ताज्या बातम्या