मेहकर (अनिल मंजुळकर. रोखठोक न्युज वृत्तसेवा)
मेहकर मतदार संघातील मेहकर व लोणार दोन्ही तालुक्यात गेल्या दोन वर्षात ४ हजार कोटींपेक्षा जास्त रकमेची विविध लोकोपयोगी विकास कामे झाल्यामुळे मतदार त्यांच्यावर बेहद खुश असल्याचे प्रचार दौऱ्यानिमित्त दिसून येत आहे. विविध पाणी योजना सभा मंडप रस्ते बांधकाम आदी स्वरूपातील बांधकामे विक्रमी संख्येने झाल्यामुळे लोकांना त्याचा थेट लाभ अनुभवायला मिळतो आहे. मतदार संघातील ज्या ज्या गावांना महायुतीचे उमेदवार संजय रायमुलकर आणि महायुतीचे पदाधिकारी गाव दौऱ्यानिमित्त भेटी देत आहेत त्या त्या ठिकाणी नागरिकांकडून अतिशय उस्फूर्तपणे स्वागत केले जात आहे.
अनेक ठिकाणी बँडच्या निनादात ,फुलांची उधळण करत प्रचार रॅली निघते तेंव्हा मोठ्या संख्येने महिला भगिनी रायमुलकर यांचे औक्षण करताना दिसून येतात. पुरुषांप्रमाणेच महिला, युवक वर्ग आणि बालगोपाल अतिशय उत्साहाने सहभागी होतात. काल तारीख १४ रोजी आमदार संजय रायमुलकर यांच्या प्रचारार्थ माळेगाव मेळजानोरी, मुंदेफळ ,हिवरा खुर्द , घुटी ,पारडी, निंबा, गोमेधर, लोणी काळे ,बार्डा उटी ,घाटनांद्रा आदी येथे त्यांनी भेट दिली. विशेषतः उटी ,गोमेधर, घाटनांद्रा या ठिकाणी नागरिकांचा प्रतिसाद उल्लेखनीय होता.
काही ठिकाणी बालगोपालांनी एकत्र येत संजय रायमुलकर जिंदाबाद , आमदार फक्त रायमुलकर काकाच , आमच्या गावची आन-बान शान धनुष्यबाण धनुष्यबाण अशा घोषणा देत रायमुलकर यांच्यासोबत फोटो काढण्याची इच्छा व्यक्त करतात त्यांना प्रतिसाद देत त्यांच्यासोबत संजय रायमुलकर यांनी फोटो काढले. माळेगाव येथील सभेत नागरिकांना मार्गदर्शन करताना आमदार संजय रायमुलकर म्हणाले की, तुमचे अपार प्रेम पाहून मी भारावून गेलो आहे गेल्या तीन निवडणुकांपेक्षाही या वेळच्या निवडणुकीत मला आशीर्वाद देणाऱ्यांची संख्या मोठी असल्याचे दिसून आले. त्या त्या गाव खेड्यांच्या गरजा लक्षात घेऊन नागरिकांच्या मागणीनुसार सर्व गावांमध्ये मोठ्या प्रमाणात शासनाच्या योजना राबवू शकलो याचा मला अभिमान आहे. सर्व जाती धर्मांच्या लोकांवर समान प्रेम करणारा मी माणूस आहे.
भेदभाव मला मान्य नाही. संपूर्ण मतदारसंघ हा मला परिवारासारखा आहे. मी स्वतःला आमदार नव्हे तर तुमच्यासाठी झटणारा एक सामान्य शिवसैनिक आहे. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वात महायुती सरकारने सर्व घटकांच्या उन्नतीसाठी मोठ्या प्रमाणावर योजना राबवल्या. शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्या निगरानीत आमची जडणघडण झालेली आहे. राजकारणापेक्षा समाजकारण अधिक करण्याची त्यांची शिकवण आम्ही प्रत्यक्ष आचरणात आणतो आहोत. आम्ही कधीच खोटी आश्वासने देत नाही.
जो शब्द देतो तो पूर्ण करण्यासाठी सतत प्रयत्न करतो, असा माझा स्वभाव आहे. मतदानाचे दिवशी धनुष्यबाण निशाणीचे बटन दाबून तुमच्या आशीर्वादाची बरसात करा, असे आवाहन त्यांनी केले. प्रचार दौऱ्यानिमित्त आमदार रायमुलकर यांनी घरोघर भेटी देत ज्येष्ठांचे आशीर्वाद घेतले. प्रत्येक ठिकाणी मंदिरात जाऊन दर्शन घेतले. सर्व लाडक्या बहिणींच्या बँक खात्यात ७५०० रुपये आले की नाही याचीही विचारपुस त्यांनी केली, तेव्हा महिलांनी सकारात्मक उत्तरे दिली. विक्रमी संख्येने प्रत्येक ठिकाणी विकास कामे झालेली असल्यामुळे नागरिकांचा त्यांना मोठा प्रतिसाद मिळाला.