spot_img

पिकविम्याची रक्कम टप्प्याटप्प्याने शेतकऱ्यांना मिळणार आहे , फॉर्म भरण्याची गरज नाही – कृषी विभागाचे शेतकऱ्यांना आवाहन

मेहकर ( अनिल मंजुळकर. रोखठोक न्युज वृत्तसेवा)

प्रधानमंत्री पिक विमा योजना खरीप २०२३ हंगामात मेहकर तालुक्यात राबविण्यात आली. योजनेच्या तरतुदीनुसार अधिसूचित स्थानिक नैसर्गिक आपत्ती , काढणी पश्चात नुकसान भरपाई व पीक कापणी आधारित नुकसान भरपाई या अंतर्गत रक्कम ९.३७ कोटी रुपये पात्र २० हजार ८१८ शेतकऱ्यांना वाटप करण्यात आली आहे.

अधिसूचित स्थानिक नैसर्गिक आपत्ती व काढणीपश्चात नुकसान भरपाई या बाबी अंतर्गत अपात्र पीक नुकसान सूचना पुनर्विलोकन करून २६ हजार १२९ शेतकऱ्यांना नुकसान भरपाई रक्कम २० कोटी ६५ लाख रुपये मंजूर झाली असून राज्य शासनामार्फत नुकसान भरपाई मधील रक्कम प्राप्त होताच संबंधित शेतकऱ्यांच्या बँक खात्यावर वर्ग करण्यात येईल ,असे तालुका कृषी अधिकारी यांनी प्रसिध्दी पत्रकाद्वारे कळविले आहे.

रब्बी हंगामा मधील योजनेच्या तरतुदीनुसार अनुसूचित स्थानिक नैसर्गिक आपत्ती या बाबी अंतर्गत २५ कोटी १३ लाख रुपये ८ हजार ३८४ शेतकऱ्यांना वाटप करण्यात आली आहे.

अधिसूचित स्थानिक नैसर्गिक आपत्ती व काढणीपश्चात नुकसान भरपाई या बाबीअंतर्गत तसेच अपात्र पीक नुकसान सूचना पुनर्विलोकन करून उर्वरित एकूण १२ हजार ९३८ शेतकऱ्यांना पात्र नुकसान भरपाई रक्कम रुपये ३२ कोटी ९८ लाख

मंजूर झाली असून त्यापैकी ८३८४ शेतकऱ्यांना रक्कम रुपये २५.१३ कोटी नुकसान भरपाई केंद्र शासनाच्या एनसीपी पोर्टल वरून शेतकऱ्यांच्या खात्यात जमा करण्यात आली आहे. उर्वरित नुकसान भरपाई रक्कम राज्य शासनाच्या प्रधानमंत्री पिक विमा योजना राबविण्याबाबतच्या शासन निर्णयानुसार राज्य शासनाचा नुकसान भरपाई मधील हिस्सा प्राप्त होताच संबंधित पात्र शेतकऱ्यांना एनसीपी पोर्टल द्वारे त्यांच्या आधार संलग्न खात्यावरती नुकसान भरपाई जमा करण्यात येणार आहे. पीकविम्याची रक्कम शेतकऱ्यांना निश्चित देण्यात येणार असल्याचे शासनाने यापूर्वीच जाहीर केलेले आहे. शेतकऱ्यांना त्यासाठी कसल्याही प्रकारचे अर्ज देण्याची आवश्यकता नाही, असा खुलासा कृषी विभागाने केला आहे.

 

ताज्या बातम्या

ताज्या बातम्या