मेहकर ( अनिल मंजुळकर. रोखठोक न्युज वृत्तसेवा )
तथागत गौतम बुद्धांनी दिलेला धम्म विचार आणि डॉ.बाबासाहेब आंबेकरांनी दिलेले तत्वज्ञान हे सदैव प्रेरणादायी असून समाजाच्या उद्धारासाठी त्यांनी आयुष्यभर केलेले कार्य खूपच प्रभावी आहे,असे विचार आमदार संजय रायमुलकर यांनी व्यक्त केले.
यशोधरा महिला मंडळ ,आनंद बौद्ध विहार, अशोका भवन, डॉ. बाबासाहेब आंबेडकर वाटिका यांच्यावतीने वाटिकेत ग्रंथ समापन सोहळा व धम्ममेळाव्यात मार्गदर्शन करतांना आमदार रायमुलकर यांनी वरील विचार व्यक्त केले. भंतेजी , भाई कैलास सुखदाने ,किशोर गवई यांच्यासह अनेक मान्यवर यावेळी उपस्थित होते. सोहळ्याला बौद्ध समाज बंधू भगिनींची मोठी गर्दी होती. आयोजकांच्या वतीने यावेळी संजय रायमुलकर यांचा सत्कार करण्यात आला.
संपूर्ण मेहकर लोणार विधानसभा मतदारसंघात विकास कामे करतांना मी कधीही भेदभाव केला नाही. इथला विकास हेच माझे एकमेव ध्येय आहे, असेही आमदार रायमुलकर म्हणाले. अशोका भवन व डॉ. बाबासाहेब आंबेडकर वाटिकेच्या सुशोभीकरणासाठी कर्तव्य भावनेने निधी उपलब्ध करून दिला.
गाव तेथे संविधान भवन बांधण्याचे माझे स्वप्न आहे, असेही ते पुढे म्हणाले. वाटिकेच्या विकासासाठी आम्ही ५० लाखाच्या निधीची मागणी केली होती, परंतु आमदार रायमुलकर यांनी दोन कोटी रुपये उपलब्ध करून दिले ,असे आपल्या भाषणात भाई कैलास सुकदाने म्हणाले.
यावेळी शाहीर संघपाल गवई व शाहीर आरतीताई इंगळे यांच्या भीम गीतांचा बहारदार कार्यक्रम पार पडला. याप्रसंगी भंते ज्ञानज्योती , भंते महाथेरो, भंते ज्ञानरक्षित, भंते गुणरत्न , भंते महेंद्रबोधी, भंते शिलरत्न यांच्यासह अनेक मान्यवर उपस्थित होते.