आयुष मंत्रालयामार्फत प्रकृती परीक्षण चिकित्सा अभियान येत्या पंधरा दिवसात देशभर सुरू करणार असून विक्रमी संख्येत नागरिकांची तपासणी करून गिनीज बुक ऑफ वर्ल्ड रेकॉर्ड मध्ये त्याची नोंद होईल इतपत व्यापक स्वरूपात हेअभियान राबविण्यात येणार आहे, अशी माहिती केंद्रीय आयुष्य आरोग्य कुटुंब कल्याण राज्यमंत्री प्रतापराव जाधव यांनी दिली.
मेहकर येथील होमिओपॅथी, निमा व डेंटल डॉक्टर्स संघटनेच्या वतीने महेश सेलिब्रेशन सभागृहात केंद्रीय मंत्री प्रतापराव जाधव यांच्या सत्कार सोहळ्याचे आयोजन करण्यात आले होते. त्यावेळी बोलताना नामदार जाधव यांनी आपल्या भाषणातून वरील माहिती दिली. आमदार संजय रायमुलकर प्रमुख अतिथी म्हणून उपस्थित होते .कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी डॉक्टर प्रशांत खडसे होते. प्रारंभी धन्वंतरी पूजन नामदार जाधव आमदार रायमुलकर यांच्या हस्ते करण्यात आले.
प्रतापराव जाधव व राजश्रीताई जाधव यांचा यावेळी भावपूर्ण सत्कार करण्यात आला. प्रास्ताविक डॉ. प्रीती आव्हाळे यांनी केले. संघटनेच्या कार्याची माहिती त्यांनी यावेळी दिली. आपल्या भाषणात प्रतापराव जाधव पुढे म्हणाले की आयुर्वेद हे पुरातन औषधोपचार पद्धती आहे.
या उपचारासाठी परदेशातूनही रुग्ण भारतात येतात. ज्या पॅथीचे शिक्षण घेतले आहे त्याच पॅथीनुसार रुग्णोपचार करण्याला डॉक्टरांनी प्राधान्य द्यावे असेही ते म्हणाले. देशातील प्रत्येक तालुक्याच्या ठिकाणी आयुष औषधी केंद्र सुरू करण्याचे आयुष मंत्रालयाचे ध्येय आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे आयुर्वेद उपचार पद्धतीवर मोठे लक्ष आहे. घर घर आयुर्वेद हे ब्रीद घेऊन देश निरोगी राहावा या उद्देशाने आयुष मंत्रालयाकडून प्रकृती चिकित्सा अभियान देशभर राबविण्यात येणार आहे.
देशभरातील आयुर्वेदिक डॉक्टर या अभियानात पाच कोटी नागरिकांची तपासणी करून आयुर्वेदिक उपचार देतील , असे सांगून नामदार जाधव पुढे म्हणाले की , देशात दिल्ली व गोवा येथे एम्स रुग्णालय असून महाराष्ट्रात ठाणे भागात एम्सचे रुग्णालय उभारण्याचा शासनाचा मानस आहे. आयुर्वेदिक औषधी मुळे रोग प्रतिबंधक शक्ती वाढते त्यामुळे आयुष मंत्रालयाकडून अमृत औषधालये देशभर सुरू करण्यात येणार आहेत.
२५ ते ३० टक्के स्वस्त ब्रॅण्डेड आयुर्वेदिक औषधी या औषधालयांमध्ये नागरिकांना प्राप्त होतील. येत्या काळात बी ए एम एस चे शिक्षण एम बी बी एस पेक्षा कुठेही कमी राहणार नाही या पद्धतीचा अभ्यासक्रम तयार करण्यात येणार आहे, अशी माहितीही प्रतापराव जाधव यांनी दिली. बुलढाणा जिल्ह्यात बी ए एम एस डॉक्टरांच्या ४५० जागा रिक्त असून त्या भरण्याबाबत संबंधितांना सूचना दिले आहेत, असेही ते म्हणाले.
आयुष मंत्रालयाच्या माध्यमातून नामदार प्रतापराव जाधव हे करीत असलेल्या उल्लेखनीय कार्याबद्दल अभिमान वाटत असल्याचे आपल्या भाषणात आमदार संजय रामुलकर म्हणाले. डॉक्टरांच्या संघटनेच्या मागणीनुसार मेहकर येथे आयुष भवन इमारत उभारण्यासाठी सहकार्य केले जाईल, असे आश्वासन आमदार रायमुलकर यांनी यावेळी बोलताना दिले. मेहकर शहरात ३५० कोटींपेक्षा अधिक रकमेची विकास कामे केल्याची माहिती देऊन भविष्यातही आणखी मोठी कामे करण्यात येतील असे आमदार रायमुलकर म्हणाले.
निमा संघटनेचे अध्यक्ष डॉक्टर निलेश सानप होमिओपॅथी संघटनेचे अध्यक्ष डॉ.प्रशांत खडसे, डेंटल डॉक्टर संघटनेचे डॉ. आशिष लोहिया यांची यावेळी भाषणे झाली. डॉ. मधुकर चांगाडे ,डॉ. सुभाष लोहिया, डॉ. मोहन राजदेरकर, डॉ. गजानन उलेमाले ,डॉ. गोविंद झंवर यांच्यासह अनेक मान्यवर यावेळी उपस्थित होते. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन डॉ. नीरज वखरे ,डॉ. पवन मंत्री यांनी केले. डॉ. रहाटे यांनी आभार मानले.