spot_img

१११ कोटींची वाढीव पाणीपुरवठा योजना मेहकर शहरासाठी जलसंजीवनी ठरणार – आमदार संजय रायमुलकर

मेहकर (अनिल मंजुळकर. रोखठोक न्युज वृत्तसेवा )

मेहकर शहराच्या सर्वांगीण विकासासाठी शेकडो कोटींच्या योजना गेल्या दोन वर्षात आणल्या असून डांबरी,सिमेंट रस्ते,नाल्या , ३२ ठिकाणी संरक्षक भिंती ,सभामंडप यासह मोठ्या प्रमाणावर कामे झाली आहेत.१११ कोटींची वाढीव पाणीपुरवठा योजना शहरासाठी जलसंजीवनी ठरणार आहे,असे विचार आमदार संजय रायमुलकर यांनी व्यक्त केले.
स्थानिक चनखोरे कॉलनी परिसरातील रहिवाशांनी त्या भागात झालेल्या विविध विकास कामांबाबत कृतज्ञता व्यक्त करण्यासाठी आमदार रायमुलकर यांच्या सत्काराचे आयोजन केले होते.

त्यावेळी मार्गदर्शन करतांना त्यांनी शहर विकासाच्या बहुविध कामांची जंत्रीच नागरिकांसमोर मांडली. हद्दवाढ मंजूर करून आणल्यामुळे दुर्लक्षित रहिलेल्या विविध भागांमध्ये मोठ्या प्रमाणावर निधी खेचून आणता आला याचा आनंद आहे, असे संजय रायमुलकर म्हणाले.

कैलास चनखोरे , पह्राड पाटील यांच्या हस्ते शाल श्रीफळ देऊन आमदार संजय रायमुलकर यांचा सत्कार करण्यात आला. रवीकुमार अग्रवाल, रमेश मानघाले, गजानन गारोळे ,भास्करराव राऊत ,डॉ. मालोकार, श्री आव्हाळे ,गणेश बचाटे ,डॉ. मुंदडा, डॉ. देशमुख ,संजय धूत, राजेश्वर देशमुख ,आशिष तनपुरे, सतीश पागोरे, शिंगणे, भावसार आदींसह अनेक मान्यवर यावेळी प्रामुख्याने उपस्थित होते.

आपल्या भाषणात रायमूलकर पुढे म्हणाले की, पेनटाकळी प्रकल्प येथे पाच विहिरी , २३ किलोमीटर जलवाहिनी, ८२ किलोमिटर अंतर्गत जलवाहिन्या , फिल्टर प्लांट ,४ मोठे जलकुंभ अशी१११ कोटी ३४ लाख रुपयांची वाढीव पाणीपुरवठा योजना शहरातील ९ हजार मालमत्तांसाठी जलसंजीवनीच ठरणार आहे. सर्व कामे जवळपास पूर्ण होत आले आहेत. पैनगंगा नदी घाट सुशोभीकरण २० कोटी, छत्रपती शिवाजी महाराज उद्यान विकास आठ कोटी बहात्तर लाख ,डॉ. बाबासाहेब आंबेडकर वाटिका दोन कोटी रुपये,विद्यार्थ्यांसाठी शाळा क्रमांक सहा जवळ सहा कोटींची अभ्यासिका, नगर परिषदेची इमारत पाच कोटी रुपये ,बालाजी मंदिर सौंदर्यीकरण आठ कोटी ९० लाख, पैनगंगा व जानेफळ रोड स्मशानभूमी सुशोभीकरण अडीच कोटी ,मेहकर येथे प्रशासकीय इमारत १० कोटी ,मेहकर शहर रस्ते विकास १२५ कोटी रुपये ,३२ खुल्या मैदानांना संरक्षण भिंती 20 कोटी, वारकरी भवन अडीच कोटी ,मेहकर पंचायत समितीची नवी इमारत १५ कोटी, पोलीस स्टेशन इमारत तीन कोटी बहात्तर लाख, मेहकर बसस्थानक सव्वातीन कोटी, बसस्थानक काँक्रीटीकरण ,सौंदर्यीकरण ४ कोटी ४२ लाख रुपये,मुस्लिम बांधवांसाठी शादीखाने , पंचपीर दर्गा साठी २५ लाखांची स्वागतकमान ,अशी कामांची मोठी जंत्री असून शेकडो कोटींची कामे शहर विकासासाठी झाली आहेत तरीही विरोधक विकास नसल्याची खोटी ओरड करत आहेत, हे दुर्दैवी असल्याचे आमदार रायमुलकर म्हणाले. मेहकर, लोणार तालुक्यात ३९०० कोटींपेक्षा जास्त रकमेची कामे झाली असल्याचा दावा त्यांनी यावेळी केला.

भूतकाळात इतक्या मोठ्या प्रमाणावर विकास कामे कधीच झाली नाहीत, त्यामुळे आमदार संजय रायमुलकर हे विकासपुरुष आहेत ,असे म्हटले तरी वावगे ठरू नये, असे सांगून आपल्या भाषणात रविकुमार अग्रवाल पुढे म्हणाले की, आमदार रायमुलकर हे पुन्हा विक्रमी मतांनी विजयी होतील यात शंका नाही. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन गणेश शिंदे यांनी केले, तर कैलास चनखोरे यांनी आभार मानले.

ताज्या बातम्या

ताज्या बातम्या