spot_img

पदाधिकारी, कार्यकर्त्यांनी ताकद पणाला लावून महायुतीचे आमदार मोठ्या संख्येने विजयी करावेत-केंद्रीय मंत्री प्रतापरावव जाधव यांचे आवाहन-शिवसेना मेळाव्यात अलोट गर्दी , मेहकर विधानसभेतील विकासकामे प्रगतीपथावर! विरोधाकांचा खरपूस समाचार

मेहकर ( अनिल मंजुळकर. रोखठोक न्युज वृत्तसेवा )

राज्य व केंद्र सरकारने मोठ्या प्रमाणात केलेली लोकहिताची कामे, घेतलेले विक्रमी निर्णय याबाबतची माहिती लोकांना द्यावी. शिवसेना पदाधिकारी कार्यकर्त्यांनी पूर्ण ताकद पणाला लावली तर इथे एकतर्फी विजय सहज शक्य आहे. आपली सर्व क्षमता वापरून महायुतीच्या सर्व आमदारांना मोठ्या मताधिक्याने विजयी करण्यासाठी आज पासूनच कामाला लागा ,असे आवाहन केंद्रीय आयुष,आरोग्य,कुटुंबकल्याण राज्यमंत्री प्रतापराव जाधव यांनी केले.

स्थानिक वृंदावन लॉन सभागृहामध्ये आज मेहकर ,लोणार तालुक्यातील शिवसेनेचे सर्व आजी-माजी पदाधिकारी व प्रमुख कार्यकर्त्यांचा मेळावा पार पडला त्यात मार्गदर्शन करताना नामदार प्रतापराव जाधव यांनी आवाहन केले. आपल्या दीड तासाच्या घणाघाती व अभ्यासपूर्ण भाषणातून कार्यकर्त्यांमध्ये त्यांनी स्फुल्लिंग पेटवले. खोटा नाट्या गोष्टी सांगून लोकांची दिशाभूल करणाऱ्या विरोधकांचाही त्यांनी खरपूस शब्दात समाचार घेतला.

आमदार संजय रायमुलकर, शिवसेनेचे जिल्हाप्रमुख प्रा. बळीभाऊ मापारी, महिला आघाडीच्या जिल्हाप्रमुख मायाताई म्हस्के, युवा सेनेचे जिल्हाप्रमुख ऋषिकेश जाधव , उपजिल्हाप्रमुख राजेंद्र गाडेकर, तालुकाप्रमुख सुरेशतात्या वाळूकर, भगवानराव सुलताने, शहर प्रमुख जयचंद बाठीया, पांडुरंग सरकटे, महिला आघाडीच्या कविताताई दांदडे, वैशालीताई सावजी व्यासपीठावर उपस्थित होत्या.

प्रारंभी मान्यवरांच्या हस्ते छत्रपती शिवरायांच्या प्रतिमेचे पूजन करण्यात आले. प्रास्ताविक बळीभाऊ मापारी यांनी केले. आपल्या भाषणात प्रतापराव जाधव पुढे म्हणाले की,लोक छोट्याछोट्या गोष्टींचा राग निवडणुकीत काढतात हे टाळले गेले पाहिजे. जनता आपले लोकप्रतिनिधी विकास कामांसाठी निवडून देते. मेहकर मतदार संघात मोठ्या प्रमाणावर विकास कामे झाली आहेत .राज्य व केंद्र सरकारने विविध लोकोपयोगी योजनांच्या माध्यमातून लक्षणीय काम केले आहे.

एक रुपयात पिकविमा योजना ,मुख्यमंत्री लाडकी बहीण योजना , मुलींच्या उच्च शिक्षणाचा पूर्ण खर्च शासन करणार , पाच लाख रुपयांपर्यंतचा मोफत वैद्यकीय उपचार करण्यासाठी आयुष्यमान भारत व इतर योजना, महिला व वयोवृध्द प्रवाशांसाठी एसटीच्या विविध योजना, शेतकऱ्यांना मिळणारे किसान सन्मान योजनेचे पैसे , कृषी पंपांची केलेली पूर्ण विज बिल माफी आदींबाबत पदाधिकारी व कार्यकर्त्यांनी लोकांमध्ये प्रचार प्रसार करावा, असे आवाहनही त्यांनी केले.

लाडकी बहीण योजनेला विरोध करत काँग्रेसचे लोक न्यायालयात गेले , इतर चांगल्या योजनांनाही ते विरोध करत आहेत , असे सांगून नामदार जाधव पुढे म्हणाले की, वैनगंगा, नळगंगा, पैनगंगा ८० हजार कोटींचा नदीजोड प्रकल्प विदर्भाला वरदान ठरणार आहे .त्याचे टेंडरही झाले आहेत.

त्यातून आपली शेती बारमाही ओलिताची होणार आहे. आम्ही सदैव लोकांच्या सुखदुःखात सहभागी होतो, परिसराचा विकास करतो. मात्र कधीही लोकांच्या सुखदुखात न दिसणारे लोक फक्त निवडणुकीच्या मोसमात उभे राहतात . निवडणुका संपल्या की, पराभूत होऊन ते परत जातात, ते पुन्हा दिसत नाहीत, अशी टीकाही त्यांनी केली.

पदाधिकारी कार्यकर्त्यांनी प्रत्येक गावामध्ये विकास कामांबद्दल लोकांना सांगावे, भरपूर मतदान करून घ्यावे, असेही त्यांनी कार्यकर्त्यांना आवाहन केले. लोकसभा निवडणुकीत ज्यांनी चुका केल्या त्यांनी आता त्या दुरुस्त कराव्यात.मुख्यमंत्री एकनाथ शिंदे हे पुढील पाच वर्षात पुन्हा मुख्यमंत्री राहिले तर महाराष्ट्राचा कायापालट होईल, असेही ते म्हणाले. उलट्यासुलट्या, खोट्या बदनामीकारक पोस्ट जर कोणी उपदव्यापी समाज माध्यमावर टाकत असतील तर त्यांना गावागावांमध्ये जागीच ठेचा, असा थेट आदेशही प्रतापराव जाधव यांनी शिवसैनिकांना दिला.

आपल्या भाषणात आमदार संजय रायमुलकर म्हणाले की, प्रतापराव जाधव यांच्या रूपाने जिल्ह्याला एक मोठे सक्षम नेतृत्व लाभलेले आहे. मेहकर लोणार तालुक्यात गेल्या अडीच वर्षात मुख्यमंत्री शिंदे यांच्या सहकार्याने ३हजार ९०० कोटींची विकास कामे आपण केली. शासनाच्या सर्व योजनांचा फायदा तळागाळातल्या माणसांना मिळवून दिला.

शासनाच्या विविध योजनांच्या माध्यमातून प्रत्येक घरामध्ये मोठ्या प्रमाणात रोख रक्कम येत आहे ,असेही ते म्हणाले. मतदार संघ हा माझा परिवार असून सातत्याने इथला विकास करत राहण्याचे माझे ध्येय आहे. पदाधिकारी कार्यकर्ते यांनी आतापासून जोमने कामाला लागण्याचे आवाहन त्यांनी केले.

आजच्या मेळाव्याला चार हजाराहून अधिक पदाधिकारी ,,कार्यकर्ते उपस्थित होते. संतोष मापारी, अक्काताई गायकवाड, नीरज रायमुलकर,दिलीपराव देशमुख,प्रा.सचिन जाधव, अशोक वारे, सचिन मगर ,डॉ.काशिनाथ घुगे ,विजय सानप, भगवानराव कोकाटे,बाजार समितीचे सभापती माधवराव जाधव, रविराज रहाटे ,कैलास चवरे,हिम्मतराव सानप , राजू मुंदडा, नितीन राऊत, हर्षल कुसळकर, राजीव तांबिले, हर्षल गायकवाड, समाधान साबळे, अशोक पसरटे आदिलसह अनेक मान्यवर प्रामुख्याने उपस्थित होते. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन सातपुते यांनी केले. सुरेशतात्या वाळूकर यांनी आभार मानले.

ताज्या बातम्या

ताज्या बातम्या