मेहकर (अनिल मंजुळकर. रोखठोक न्युज वृत्तसेवा )
मेहकर येथे वन परिक्षेत्र कार्यालय व अधिकारी निवासस्थानांच्या नव्याने बांधकामासाठी वन व महसूल विभागाने आमदार संजय रायमुलकर यांच्या मागणीवरून ३ कोटी २० लाख रुपये निधी मंजूर केला असून तसे परिपत्रक प्रसृत करण्यात आले आहे.
वन खात्याची कार्यालये आणि निवासस्थाने या इमारती जुन्या झाल्या असून त्यांची अवस्था वाईट आहे.म्हणून या सर्व इमारतींच्या नव्याने बांधणीसाठी निधी मंजूर करण्याची मागणी आमदार संजय रायमुलकर यांनी वन मंत्री सुधीरभाऊ मुनगंटीवार यांच्याकडे सातत्याने केली होती.
वन खात्याचे उपसचिव विवेक होशींग यांच्या स्वाक्षरीने निर्गमित करण्यात आलेल्या परिपत्रकानुसार सदर बांधकामांना मंजुरी प्रदान करण्यात आली आहे.मेहकर येथे वनपरिक्षेत्र कार्यालय , सहायक वनसंरक्षक कार्यालय बांधकाम यासाठी एक कोटी ८५ लाख तर निवासस्थानांच्या बांधकामांसाठी एक कोटी ३५ लाख रुपये मंजूर करण्यात आले आहेत.येत्या काळात या बांधकामांना प्रारंभ होणार आहे.ही कामे मंजूर केल्याबद्दल आमदार संजय रायमुलकर यांनी वनमंत्री सुधीरभाऊ मुनगंटीवार यांचे आभार मानले आहेत.