मेहकर (अनिल मंजुळकर. रोखठोक न्यूज वृत्तसेवा)
हिंदू मुस्लिम बांधवांनी मानवतेच्या भावनेची जपणूक करण्यासाठी एकत्र येऊन सण उत्सव साजरी करावेत. शांततेत उत्सव साजरे करण्याची इथली परंपरा नागरिकांनी पुढे सुरू ठेवावी. नागरिकांनी कायद्याचे भान ठेवले तर शांतता व सुव्यवस्था आपोआप अबाधित राहते, असे विचार आमदार संजय रायमुलकर यांनी व्यक्त केले.
मेहकर येथे आज ता. ११ रोजी केव्ही प्राइड सभागृहात आयोजित गणेशोत्सव ,ईद-ए-मिलाद शांतता समितीच्या मेहकर, लोणार तालुका विभागीय बैठकीत प्रमुख अतिथी म्हणून आमदार संजय रायमुलकर बोलत होते. जिल्हा पोलीस अधीक्षक विश्व पानसरे, अप्पर पोलीस अधीक्षक श्री महामुनी ,उपविभागीय अधिकारी रवींद्र जोगी ,उपविभागीय पोलीस अधिकारी प्रदीप पाटील, कृषी उत्पन्न बाजार समितीचे सभापती माधवराव जाधव ,राजेंद्र पळसकर यावेळी प्रामुख्याने उपस्थित होते.
गणपती मंडळांनी मिरवणूक शांततेत व वेळेत पार पाडावी, कुठलाही अनुचित प्रकार घडणार नाही , सलोख्याचे वातावरण बिघडणार नाही याची सर्व धर्मीयांनी काळजी घ्यावी , असे आवाहन करून आमदार संजय रायमुलकर यांनी मेहकर शहरातील तीन गणेश उत्सव मंडळांना ५१ हजार रुपये, ३१ हजार, २१ हजार रु. असे तीन गणराया पुरस्कार देण्यात येतील अशी घोषणा केली.
बैठकीत मार्गदर्शन करतांना जिल्हा पोलीस अधीक्षक विश्व पानसरे म्हणाले की, मिरवणुकांमध्ये संयम बाळगावा. नियोजित वेळेत मूर्तींचे विसर्जन करावे व डीजे चा आवाज ७५ डेसिबल पेक्षा कमी ठेवावा. ढोल ताशे, लेझीम आधी परंपरागत वाद्यांचाच मिरवणुकीत वापर करावा .त्याचप्रमाणे रासायनिक पदार्थयुक्त गुलाल वापरू नका. यावेळी श्री महामुनी ,नसीम खान, खंडू सवडतकर, प्रा. आशिष रहाटे, राजेंद्र पळसकर यांनी आपले विचार व्यक्त केले.
बैठकीला मेहकरचे ठाणेदार राजेश शिंगटे, डोणगाव चे अमर नागरे , जानेफळ चे आदिनाथ मोरे, लोणार येथील मेहत्रे यांच्यासह पोलीस विभागाचे अधिकारी व कर्मचारी , शांतता समितीचे सदस्य,गणेश मंडळांचे पदाधिकारी,नागरिक ,पत्रकार उपस्थित होते. सूत्रसंचालन प्रा. कृष्णा हावरे यांनी केले तर संदीप पाटील यांनी आभार मानले.