मेहकर (अनिल मंजुळकर. रोखठोक न्युज वृत्तसेवा)
आमदार संजय रायमुलकर यांच्या अथक प्रयत्नातून मंजूर झालेल्या मेहकर पोलीस स्टेशनच्या तीन कोटी ८२ लाख रुपये खर्चाच्या इमारत बांधकामाच्या निविदा प्रक्रियेला सुरुवात झाली असून वर्षभरात ही अद्ययावत अशी पोलीस स्टेशनची टोलेजंग इमारत पूर्ण होणार आहे.
मेहकर पोलीस स्टेशनची सध्याची जुनी इमारत ही जीर्ण झाली असून सर्व सुविधांनीयुक्त अशी नवीन इमारत मेहकर येथे व्हावी , पोलीस अधिकारी , कर्मचारी निवासस्थाने बांधकाम मेहकर,लोणार, डोणगाव येथे करावे, अशीमागणी आमदार संजय रायमुलकर यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचेकडे ८ जुलै २०२२ रोजी आणि उपुख्यमंत्री तथा गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांना २९ डिसेंबर २३ रोजी केली होती.मेहकर येथे ८ अधिकारी , अंमलदार यांच्यासाठी ४० निवासस्थाने बांधकामांबाबत आराखडा पोलीस महासंचालक पोलीस गृहनिर्माण महामंडळ यांचेकडे पाठविण्यात आला होता.लोणार येथे अधिकारी,पोलीस कर्मचारी यांच्या ५० अद्ययावत निवासस्थानांचा प्रस्ताव पाठविण्यात येऊन त्याचा सातत्याने आमदार रायमुलकर यांनी केला होता.
आमदार रायमुलकर यांच्या प्रयत्नातून जानेफळ येथील पोलीस स्टेशनची इमारत पूर्ण झाली आहे.
मेहकर पोलीस स्टेशनच्या तीन कोटी ८२ लाख रुपये खर्चाच्या अद्ययावत इमारत बांधकामाची निविदा प्रक्रिया आमदार रायमुलकर यांच्या प्रयत्नातून सुरू झाली असून येत्या वर्षभरात सर्व सुविधायुक्त अशी ही इमारत उभे राहणार आहे.
दोन मजल्याच्या या इमारतीत तळमजल्यात पोलीस निरीक्षक कक्ष, सहाय्यक पोलीस निरीक्षक कक्ष, बंदी गृह, वायरलेस रूम, ठाणे अंमलदार कक्ष ,बारनिशी कक्ष ,सीसीटीएनएस कक्ष, चौकशी कक्ष, पासपोर्ट पडताळणी कार्यालय, भोजन कक्ष, महिला व पुरुषांसाठी स्वच्छतागृह होणार असून पहिल्या मजल्यावर अभिलेख मुद्देमाल शस्त्रागार कक्ष त्याचबरोबर सभागृह ,निर्भया हॉल ,हिरकणी कक्ष ,महिला विश्रांती कक्ष, पुरुष विश्रांती कक्ष, महिला पुरुषांसाठी स्वच्छतागृह आदींचा या बांधकामात समावेश आहे.
दोन्ही मजल्यावर मॉड्युलर फर्निचर, सीसीटीव्ही प्रणाली ,अग्निशमन व्यवस्था, सोलर सिस्टिम, सिमेंट काँक्रेटचे रस्ते, संरक्षक भिंत, मुख्य प्रवेशद्वार, भूमिगत पाणी टाकी ,सेप्टिक टॅंक आणि 63 किलोवॅटचे विद्युत रोहित्र व पथदिवे अशा सुविधा होणार आहेत. मेहकर येथे पोलीस अधिकारी व कर्मचारी यांच्यासाठी 48 48 निवासस्थाने, लोणार येथे 50 निवासस्थाने व डोणगाव येथे बारा निवासस्थाने बांधकामांची निविदप्रक्रियाही लवकरच सुरू होणार आहे.