spot_img

रोजगार निर्मितीतून युवकांना बळ देण्याचे मुख्यमंत्र्यांचे ध्येय – आमदार संजय रायमुलकर

मेहकर (अनिल मंजुळकर. रोखठोक न्युज वृत्तसेवा)

राज्याच्या इतिहासात सामान्य माणसांच्या हितासाठी मोठ्या प्रमाणावर योजनांची अंमलबजावणी करणारे एकनाथ शिंदे हे एकमेव मुख्यमंत्री असून रोजगार निर्मितीतून युवाशक्तीला बळ बळ देणे हे मुख्यमंत्र्यांचे ध्येय आहे , असे विचार मेहकर चे आमदार संजय रामुलकर यांनी व्यक्त केले.

मुख्यमंत्री युवा कार्य प्रशिक्षण योजनेअंतर्गत मेहकर तालुक्यातील ११० युवकांना ८ ते १० हजार रुपये प्रतीमाह मानधनावर नियुक्तीपत्रे आमदार संजय रायमुलकर यांच्या हस्ते प्रदान करण्यात आली. स्थानिक नवीन प्रशासकीय इमारतीच्या सभागृहात हा सोहळा पार पडला. उपविभागीय अधिकारी रवींद्र जोगी, गटविकास अधिकारी आर. बी .पांढरे , सरपंच संघटनेचे तालुका अध्यक्ष अरुण दळवी,दुर्गादास रहाटे प्रमुख अतिथी म्हणून उपस्थित होते.

कार्यक्रमाच्या सुरुवातीला चक्रधर स्वामींच्या प्रतिमेचे पूजन रायमुलकर यांच्या हस्ते करण्यात आले. पाहुण्यांचे स्वागत विस्तार अधिकारी शिवाजी गवई, शिवाजी पंडागळे यांनी केले. आपल्या प्रास्ताविक भाषणात प्रभारी गटविकास अधिकारी संदीप मेटांगळे म्हणाले की, महास्वयम पोर्टलवर नोंदणी केलेल्या बेरोजगार ११० युवकांना मुख्यमंत्री युवा कार्य प्रशिक्षण योजनेअंतर्गत प्रशिक्षण देऊन ग्रामपंचायत सहाय्यक ऑपरेटर पदावर सहा महिन्यासाठी नियुक्ती देण्यात आल्या आहेत. त्यांना मिळणाऱ्या मानधनाची रक्कम त्यांच्या बँक खात्यात थेट जमा होणार आहे. त्यांना अनुभवाचे प्रमाणपत्र हे देण्यात येणार आहे.

आपल्या भाषणात आमदार रायमुलकर पुढे म्हणाले की, मेहकर तालुक्यातील एक लाख सात हजार मुख्यमंत्री लाडकी बहिण योजनेचे अर्ज मंजूर करण्यात आले असून त्यांना आता दरमहा पंधराशे रुपये मिळणार आहेत. केंद्रीय राज्यमंत्री प्रतापराव जाधव यांच्या मार्गदर्शनाखाली आणि मुख्यमंत्री शिंदे यांच्या सहकार्याने मेहकर विधानसभा मतदारसंघात जवळपास ४ हजार कोटींची विकास कामे करण्यात आली आहेत. शेतकऱ्यांच्या हितासाठी एनडीआरएफ चे निकष बदलणारे मुख्यमंत्री शिंदे हे एकमेव आहेत.

एक रुपयात पिक विमा भरता येतो, त्यामुळे गोरगरीब शेतकऱ्यांनाही पीक विम्याचा मोठ्या प्रमाणात फायदा झाला आहे. प्रधानमंत्री व मुख्यमंत्री किसान योजनेमुळे शेतकऱ्यांच्या खात्यात भरीव रक्कम आलेली आहे. शेतकरी, कामगार, युवावर्ग ,विद्यार्थिनी आणि महिलांसाठी महायुती सरकारने मोठ्या प्रमाणात योजना आणल्या त्याचा लाभ सर्वांना होत आहे.

आज नियुक्तीपत्रे दिलेल्या युवकांनी ग्रामीण भागातील नागरिकांची मनापासून सेवा करावी व शासनाच्या योजनांची माहिती तळागाळातल्या घटकांना द्यावी , असे आवाहनही आमदार संजय रायमुलकर यांनी केले.

यावेळी माधुरी राठोड, अनुजा चव्हाण ,कोमल कुराडे, अजय कोरडे, संत संदेश मोगल, दीपक निकम ,युवराज पवार ,गणेश मोरे, दिव्या राठोड ,विजय राठोड, विकास खडसे, सोनल जाधव ,ज्ञानेश्वर कंकाळ, आदींसह ११० युवक युवतीना नियुक्तीपत्रे रायमुलकर यांच्या हस्ते प्रदान करण्यात आली.

ताज्या बातम्या

ताज्या बातम्या