मेहकर (अनिल मंजुळकर : रोखठोक न्युज वृत्तसेवा )
दोन दिवसांपासून जिल्ह्यात कोसळधार सुरू असून, ऑगस्ट अखेरीस मृतसाठ्यात असलेल्या खडकपूर्णात खळखळाट झाला आहे. सर्वप्रथम नळगंगा प्रकल्पातील जलसाठ्यात वाढ झाली होती. दरम्यान, आता पेनटाकळी प्रकल्प ओवरफ्लो होण्याच्या दिशेने जात असल्याचे चित्र आहे.
जिल्ह्यात सिंचन सुविधा उपलब्ध नसल्याने, पावसाच्या पाण्यावरच शेती अवलंबून आहे. नळगंगा, खडकपूर्णा, पेनटाकळी हे मोठे प्रकल्प शेतकऱ्यांसाठी जीवन वाहिनी ठरले आहे. मान्सूनच्या सुरुवातीला कमी प्रमाणात पाऊस झाल्याने शेतकऱ्यांची चिंता वाढली होती. मात्र सप्टेंबर महिना सुरू होताच, पावसाने जोर धरला आहे. मागील दोन दिवसांपासून जिल्ह्यात कोसळधार सुरू असून, बहुतांश ठिकाणी जनजीवन विस्कळीत झाले आहे. हवामान विभागाने वर्तवलेल्या अंदाजानुसार पुढील चार ते पाच दिवस पावसाचा जोर कायम राहणार आहे.
पेनटाकळी प्रकल्प व्यवस्थापनाने दिलेल्या माहितीनुसार ७२ टक्के जलसाठा धरणामध्ये उपलब्ध झाला आहे. हवामानाचा अंदाज लक्षात घेता, कधीही पेनटाकळी प्रकल्पाची वक्रदारे उघडून विसर्ग सोडण्यात येईल. यामुळे पैनगंगा नदीला पूर देखील येऊ शकतो. यामुळे मेहकर तालुक्यातील तसेच परिसरातील सर्व गावांना सतर्कतेचा इशारा देण्यात आला आहे. यासाठी उपविभागीय अभियंता शरद नांगरे, कनिष्ठ अभियंता आकाश शिंदे व पूर नियंत्रण कक्ष दिनेश अवस्थी पेन टाकळी प्रकल्पावर हजर आहेत.